प्रत्येकाने आपापल्या जबाबदाऱ्या सांभाळल्या तर वाद होणार नाहीत- जयंत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2020 06:41 IST2020-03-06T04:06:59+5:302020-03-06T06:41:32+5:30
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्याशी झालेली ही बातचित.

प्रत्येकाने आपापल्या जबाबदाऱ्या सांभाळल्या तर वाद होणार नाहीत- जयंत पाटील
मुंबई : हे तीन पक्षांचे सरकार आहे. प्रत्येक मंत्र्यांनी त्यांना स्वत:ला दिलेली जबाबदारी सांभाळली आणि धोरणात्मक विषय महाविकास आघाडीच्या समन्वय समितीत चर्चा करुनच बाहेर बोलण्याची सवय लावली तर या सरकारमध्ये कोणतेही वाद होणार नाहीत, अशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्याशी झालेली ही बातचित.
या सरकारला १०० दिवस पूर्ण झाले. या काळात तुम्हाला जे अपेक्षीत होते ते पूर्ण होत आहे का?
राज्यात कर्जमाफीचा सगळ्यात जटील प्रश्न होता. आम्ही विरोधी बाकावरुन तो प्रश्न सतत मांडत होतो. कर्जमाफी देऊ असे वचन आम्ही जनतेला दिले होते. सत्तेत आल्यानंतर ते पूर्ण करण्याची संधी आम्हाला मिळाली. ते करताना लाखो शेतकऱ्यांना दिलासा देता आला. आता रितसर कर्ज भरणाºयांना दिलासा देण्याची तयारी सुरु आहे. पहिल्या शंभर दिवसात आम्ही २५ लाख शेतकºयांना कर्जमाफी देऊ शकलो यासारखे मोठे समाधान नाही.
मंत्री सतत वादग्रस्त विधाने करत आहेत. त्याचा परिणाम सरकारवर होत नाही का? यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही
नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे.
नवाब मलिक यांनी मुस्लिम आरक्षणाचा किंवा नितीन राऊत यांनी १०० युनीटपर्यंत वीजमाफीचा विषय मांडला, मात्र त्यातून त्यांनी विभागाचे मत सांगितले. सभागृहात काही विषय आले तर त्यावर उत्तर द्यावे लागते. त्या उत्तरातून सरकारची व मंत्र्यांची सकारात्मता दिसून येते. त्यामुळे लगेच काही विरोधी मतप्रवाह आहेत असे अर्थ काढता येणार नाहीत. काही काळ जावा लागेल, म्हणजे आपोआप सगळे नीट होईल.
शिवसेनेसोबत जाण्याआधी राष्ट्रवादीचे मत काय होते आणि आता १०० दिवसांनी तुमचे मत काय झाले आहे?
शिवसेनेसोबतच्या कामाचा अनुभव नव्हता. शिवसेनेला कोणतीही गोष्ट पटवून देणे अशक्य आहे, असे आम्हाला भाजपचे नेते सांगायचे. शिवसेनेची प्रतिमा खलनायकी व्हावी असे भाजपला सतत वाटत असावे म्हणूनच ते तसे सांगत होते हे आता आम्हाला कळाले आहे. उलट शिवसेनेचे नेते अभ्यासू आहेत. त्यांना महाराष्टÑात चांगल्या गोष्टी व्हाव्यात असे वाटत आहे. त्यामुळे भाजपचे प्रेम पुतनामावशीचे होते हे आम्हाला कळाले आहे. उलट आमची मैत्री निखळ आणि महाराष्टÑाच्या भल्यासाठी झाली आहे. आमचा अनूभव खूप चांगला आहे.
हे सरकार पाच वर्षे टिकणार हे तुम्ही कशाच्या भरवशावर म्हणता?
आम्ही सत्तेवर आल्यापासून जेवढ्या निवडणुका झाल्या त्यात सगळीकडे महाविकास आघाडीने विजय मिळवला आहे. सरकार नसले तर काय होते हा अनुभव काँग्रेस, राष्टÑवादीने गेल्या पाच वर्षात घेतला आहे. भाजपच्या काळात जे काही आम्हाला करता आले नाही ती विकासाची कामे आता आम्ही तीघे मिळून करत आहोत.
तीन पक्षात कसा समन्वय आहे आणि वाद कधी संपणार आहेत?
समन्वय चालू झालाय. मधेच एखादे वेगळे उत्तर येणे हा अपघात आहे. आधीच चर्चा झाली तर व्यवस्थीत उत्तरे देता येतात. धोरणात्मक विषय समन्वय समितीत आधी चर्चा करुन बाहेर दिली जावीत अशा सूचना स्वत: मुख्यमंत्री ठाकरे यांनी केल्या आहेत. नवीन सरकार आहे, सगळ्यांमध्ये उत्साह आहे, माध्यमांनी लगेच या सगळ्या गोष्टींना वादाचे, मतभेदाचे रुप देऊ नये.