मुंबई : शिवसेनेने विचारधारा बदलेली नाही, बदलणारही नाही. मी आणि आपली शिवसेना कुणापुढे लाचारही होणार नाही, अशी ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दिली. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यभरातील पक्ष पदाधिकाऱ्यांशी ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.अन्यायाविरुद्ध लढण्यासाठीच शिवसेनेचा जन्म झाला आहे. शिवसेनाप्रमुखांची तीच परंपरा मी पुढे घेऊन जात आहे. विश्वास ठेवणे ही आमची कमजोरी नाही, संस्कृती आहे. पण आपल्यासोबत राजकारण करण्याचा प्रयत्न झाला. ते राजकारण मोडीत काढल्यामुळेच मी आज मुख्यमंत्री म्हणून बसलो आहे, असा टोलाही त्यांनी भाजपला हाणला. भविष्यात शिवसैनिकाला पंतप्रधानही बनविणार, असा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला.चक्रीवादळ असो की कोरोनाचे संकट, शिवसैनिक प्रत्येक ठिकाणी उभा आहे. शिवसेनेच्या शाखा आता दवाखाने बनल्या आहेत. डॉक्टरांना सर्व उपयोगी वस्तू दिल्या जात आहेत. जिवाची पर्वा न करता शिवसैनिक झटत आहे. शिवसैनिक कधीही संकटाला घाबरणार नाही, डगमगणार नाही. शिवसैनिक सोबत असेपर्यंत मला कुणाचीही भीती नाही. शिवसेना हेच एक वादळ आहे, त्यामुळं आम्हाला इतर वादळांची पर्वा नाही. शिवसैनिक माझे कवचही आहे आणि त्यांचा वचकही आहे. मुख्यमंत्री झाल्यामुळे आपल्यासोबत संपर्क कमी झाला असला तरी मी नात्यात अंतर पडू देणार नाही, असा शब्द ठाकरे यांनी दिला.शिवनेरीची माती आणि मुख्यमंत्रिपदशिवनेरी किल्ल्यावरची माती घेवून मी अयोध्येला गेलो. तर वर्षभरात राम मंदिराचा निकाल लागला. राज्याचे मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे असून ही सगळी कमाल शिवनेरीवरील मातीची असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, आपण सत्ता हाती घेतली आहे, तेव्हापासून आपण १०० टक्के समाजकारण केले आहे. गाव तिथे शाखा हे काम आपल्याला हाती घ्यायचे आहे.
विचारधारा तीच राहणार, लाचारी पत्करणार नाही; शिवसेना वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 06:47 IST