IAS अधिकारी तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली; आता 'या' खात्याची मिळाली जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2024 15:41 IST2024-06-18T15:37:37+5:302024-06-18T15:41:35+5:30
Tukaram Mundhe Transfer : तुकाराम मुंढे हे आपल्या धडाडीच्या कामामुळे प्रसिद्ध राहिले आहेत, तर राजकीय नेत्यांसोबत सातत्याने खटके उडाल्याने वादग्रस्त अधिकारी म्हणूनही त्यांनी ओळख राजकीय वर्तुळात आहे.

IAS अधिकारी तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली; आता 'या' खात्याची मिळाली जबाबदारी
मुंबई : राज्यातील सात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्याचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी बदलीचे आदेश जारी केले आहेत. बदली झालेल्या आयएएस अधिकाऱ्यांमध्ये तुकाराम मुंढे यांचा देखील समावेश आहेत. दरम्यान, गेल्या १९ वर्षांच्या कारकिर्दीत तुकाराम मुंढे यांची ही २२ वी बदली आहे. तुकाराम मुंढे यांच्याशिवाय रणजीत कुमार, नीमा अरोरा, व्ही राधा, अमन मित्तल, अमगोथू श्रीरंगा नायक, रोहन घुगे या अधिकाऱ्यांची सुद्धा बदली करण्यात आले आहे.
तुकाराम मुंढे हे आपल्या धडाडीच्या कामामुळे प्रसिद्ध राहिले आहेत, तर राजकीय नेत्यांसोबत सातत्याने खटके उडाल्याने वादग्रस्त अधिकारी म्हणूनही त्यांनी ओळख राजकीय वर्तुळात आहे. मात्र, तुकाराम मुंढे आणि बदली हे नवं समीकरण राज्यात गेल्या काही वर्षात पाहायला मिळत आहे. गेल्यावर्षी पशुसंवर्धन आणि दुग्ध विकासाच्या सचिवपदी बदली करण्यात आलेल्या तुकाराम मुंढे यांची आता पुन्हा एकदा बदली झाली आहे. आता त्यांच्याकडे असंघटित कामगार विभागाचे (मुंबई) विकास आयुक्त म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर तुकाराम मुंढे यांच्याकडे असलेल्या सध्याच्या पदाचा कार्यभार राजेश कुमार यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
तुकाराम मुंढे २००५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. तुकाराम मुंढे यांनी सोलापूरचे उपजिल्हाधिकारी म्हणून ऑगस्ट २००५ मध्ये आपल्या प्रशासकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर, विविध जिल्ह्यात जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त आणि सचिवपदी त्यांनी कारकीर्द गाजवली. कर्मचाऱ्यांना कडक शिस्त लावण्याच्या हेतूने तुकाराम मुंढे जे निर्णय घेतात, तेच त्यांच्या बदलीचे कारण ठरते, अशी चर्चा नेहमीच असते. मात्र, सातत्याने बदली होणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख राज्यात झाली आहे. तुकाराम मुंडे यांच्या १९ वर्षांच्या कारकिर्दीत २२ वेळा बदली झाली आहे.
आयएएस अधिकारी बदल्यांची यादी
तुकाराम मुंडे- विकास आयुक्त (असंघटित कामगार), मुंबई
रणजीत कुमार - अतिरिक्त महासंचालक, यशदा, पुणे
नीमा अरोरा - सह आयुक्त वस्तू व सेवा कर, मुंबई
व्ही राधा - प्रधान सचिव (कृषी), कृषी व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई
अमन मित्तल - सह मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र इन्स्टिट्युशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशन-मित्र, मुंबई
अमगोथू श्रीरंगा नायक - आयुक्त (कुटुंब कल्याण) व संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई
रोहन घुगे- मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (ठाणे)