'मी चूक करणार नाही', अमृता फडणवीसांचा एकनाथ खडसेंना चिमटा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2020 06:37 IST2020-09-13T03:04:38+5:302020-09-13T06:37:14+5:30
खडसे यांचा राजीनामा माझ्यामुळे नव्हे तर एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणामुळे घेण्यात आला होता, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.

'मी चूक करणार नाही', अमृता फडणवीसांचा एकनाथ खडसेंना चिमटा
मुंबई : तुम्ही खात्री बाळगा एकनाथ खडसेजी, तुमच्या जीवनातून खूप काही शिकल्यामुळे मी अशी चूक करणार नाही! सर्वांचे भले होवो!, असा चिमटा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी भाजप नेते एकनाथ खडसे यांना काढला आहे.
खडसे यांचा राजीनामा माझ्यामुळे नव्हे तर एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणामुळे घेण्यात आला होता, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. यावर उत्तर देताना खडसे यांनी आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचे म्हटले होते. एमआयडीसीच्या जमिनीशी माझा संबंध नाही.
ही कथित जमीन माझी बायको आणि जावयाने घेतली. याबाबत माझा व्यवहार झालेला नाही. मी महसूलमंत्री होतो, म्हणून पदाचा गैरवापर करण्याचा काय संबंध? मंत्री असताना माझ्या कुटुंबाने व्यवहार करायचे नाहीत का, असा सवाल खडसेंनी केला होता.
समजा अमृता फडणवीस यांनी व्यवहार केला तर तो देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा केलेला गैरवापर होतो का, असे खडसे म्हणाले होते. खडसेंनी दिलेल्या उदाहरणावर अमृता फडणवीस यांनी, ‘मी अशी चूक करणार नाही’, असे ऐकविले आहे.
फडणवीस मायलेकीस
लागला पोपटाचा लळा
देवेंद्र फडणवीस यांचा शासकीय बंगला (सागर) हा समुद्रकिनारी आहे. या बंगल्याच्या व्हरांड्यात मरणप्राय अवस्थेतील एक पोपट आला.
अमृता फडणवीस आणि
त्यांच्या कन्या दिविजा यांनी त्याची शुश्रूषा केली. तिघांना एकमेकांचा लळा लागला. आता तो बिनधास्त त्यांच्याजवळ येऊन बसतो.
‘तुम्ही कोणावर प्रेम करीत असाल तर त्याला मोकळा श्वास घेऊ द्या, परत आला तर तो तुमचा असेल, परतला नाही तर तो तुमचा नव्हता समजा,’ असे भावनिक टिष्ट्वट अमृता यांनी केले आहे.