'त्या अधिकाऱ्यांची मस्ती उतरवतो आणि बंदोबस्त करतो', मुनगंटीवार-पटोलेंचा प्रश्न, अजित पवारांचं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 01:57 IST2025-03-12T01:56:02+5:302025-03-12T01:57:39+5:30
विधानसभेत तांदूळ खरेदी संदर्भातील लक्षवेधी मांडताना सुधीर मुनगंटीवार आणि नाना पटोले यांनी गंभीर बाब मांडली. त्यावर अधिकाऱ्यांची मस्ती उतरवतो, असे उत्तर अजित पवारांनी दिले.

'त्या अधिकाऱ्यांची मस्ती उतरवतो आणि बंदोबस्त करतो', मुनगंटीवार-पटोलेंचा प्रश्न, अजित पवारांचं उत्तर
तांदूळ खरेदीत रॅकेट असून, अधिकाऱ्यांचे रेटकार्डही ठरले आहे. त्यांची नावे आणि पदाचा उल्लेख करू शकत नाही, असे भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत सांगितले. तर अधिकारी मंत्र्यांच्या नावाने पैसे घेताहेत असा दावा नाना पटोलेंनी केला. याला उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, 'मी कुणालाही सोडणार नाही. त्या अधिकाऱ्यांची मस्ती उतरवतो.'
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
तांदूळ खरेदी रॅकेटचा प्रश्न मांडतांना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, 'हे एक अनेक वर्षांपासून चालणार रॅकेट आहे. दोन गोष्टींचा खुलासा होणे आवश्यक आहे. मानवी खाण्यासाठी अयोग्य असल्याचा अहवाल दाखवला. उच्च न्यायालयाने स्थगिती दिली असे सांगितले. काळ्या यादीत टाकण्यास हायकोर्टाने स्थगिती दिली, मान्य. पण, त्याला जबरदस्तीने काम द्या, हे सांगायचा अधिकार हायकोर्टालाही नाहीये. तरीही विभागाने पैसे खाऊन त्याला पुन्हा काम दिले."
पैसे दिले नाही तर तांदूळ खरेदी करत नाहीत -मुनगंटीवार
"दोन कोटी ७ लाख रुपयांचा दंड आकारला २०२३ मध्ये आणि आम्हाला जी माहिती आहे, १ रुपयांचाही दंड भरलेला नाही. कागदोपत्री कारवाई करायची. त्या जिल्ह्यातील व्यक्तीने रेटकार्ड पाठवलं. मी नावं किंवा पद घेत नाही. पैसे दिले नाही म्हणून काही लोकांचा तांदूळच उचलत नाही. काही लोकांना लॉट देत नाही. जे पैसे देतात, त्यांना लॉट देतात. योग्यवेळी तांदूळ घेत नाही. पावसाने भिजल्यावर घ्यायचे. यासंदर्भात सरकार काय काळजी घेणार आहे?", असा प्रश्न मुनगंटीवारांनी केला.
"सुतासारखं सरळ करण्याचे काम करेल"
याला उत्तर देताना अजित पवार म्हणाले, "माहिती घेत असताना मला हे लक्षात आलंय. मी ताबडतोब यासंदर्भातील नस्तीचा निपटारा करणार आहे. त्यांनी पैसे वगैरे, त्यात ज्या दिवसापासून त्यांना दंड झाला आहे, त्या दिवसापासून १२ टक्के व्याज लावून पैसे वसूल करता येतात का? हे तपासून घेतो. असे निर्णय घेतो की, त्यांना कोर्टात जाता येणार नाही. बाकीच्यांना धाक बसला पाहिजे. संपूर्ण कडक कारवाई केली जाईल. कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. सुतासारखं सरळ करण्याचे काम करेन."
मंत्र्यांच्या नावाने पैसे घेतात
काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनीही प्रश्न उपस्थित केला. पटोलेंनी तांदूळ मिल्सची नावेच सभागृहात सांगितली. अन्न आणि पुरवठा विभागाचे अधिकारी यात मिळालेले आहेत. त्याचे धागेदोरे सगळे मंत्रालयापर्यंत आहे. मंत्र्यांच्या नावाने पैसे घेतात, असे पटोलेंने विधानसभेत सांगितले.
त्यांची मस्ती उतरवतो, कुणालाही सोडणार नाही -अजित पवार
अजित पवार म्हणाले, "मी स्वतः त्याबद्दलची बैठक घेऊन, आता जी काही नावं दिली आहेत, मिल दिलेल्या आहेत. तिथले अधिकारी किती वर्षांपासून आहे, हे सगळं काही मी आठ दिवसात मागवून घेतो. आणि जे अधिकारी निगगट्ट झाले. अक्षरशः त्यांना मस्ती आलेली आहे. त्यांची मस्ती देखील उतरवतो आणि यांच्या सगळ्यांचा बंदोबस्त करतो. यामध्ये कुणालाही मी सोडणार नाही. तो कुठल्या पक्षाचा असो, गटाचा असो... मला काही त्याच्याशी घेणं देणं नाही. मी त्याच्यावर कारवाई करेन आणि असा मेसेज देईल की, मंत्र्यांनी मनात आणलं, तर त्यात दुरुस्ती होऊ शकते", असे उत्तर अजित पवारांनी दिले.