"मी विनोदाने बोललो, तो आकडा कोटीत नव्हे तर लाखात..."; प्रकाश सोळंकेंचा नवा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 17:29 IST2025-03-11T17:26:26+5:302025-03-11T17:29:09+5:30
आम्ही जेवढे लागेल तेवढे खर्च केले आणि बाकीचे पैसे पक्षाला परत दिलेत असं आमदार प्रकाश सोळंके यांनी सांगितले.

"मी विनोदाने बोललो, तो आकडा कोटीत नव्हे तर लाखात..."; प्रकाश सोळंकेंचा नवा खुलासा
मुंबई - निवडणुकीत १०-१२ कोटी खर्च केले या विधानावरून आमदार प्रकाश सोळंके यांनी घुमजाव केले आहे. मी विनोदाने भाषणात ते बोललो, विरोधकांनी खूप खर्च केला मी कमी केला असं सांगायचे होते, ते आकडे कोटीत नसून लाखात आहेत असं मी लगेच भाषणानंतर स्पष्ट केले असं सांगत आमदार प्रकाश सोळंके यांनी पक्षाकडून प्रत्येक उमेदवाराला ४० लाख रूपये दिल्याचा खुलासा केला आहे.
प्रकाश सोळंके यांचं विधान सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर त्यांनी यावर स्पष्टीकरण दिले. विधान भवन परिसरात माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर प्रकाश सोळंके म्हणाले की, ते वाक्य मी भाषणात बोललो होतो. विनोदातून ते विधान केले. विरोधकांनी खूप खर्च केले मी कमी केला असं सांगितले. मला जी मर्यादा घालून दिली तितकाच खर्च केला. ४० लाख पक्षाने पाठवले, त्यातील २३ लाख खर्च केले उर्वरित पैसे पक्षाला परत पाठवले. पक्षाने प्रत्येक उमेदवाराला ४० लाख दिले. हा व्यवहार चेकने झाला आहे. त्यामुळे रोकड असल्याचं संबंध नाही असं त्यांनी म्हटलं.
त्याशिवाय मी विनोदाने ते बोलत होतो. निवडणुकीतील परिस्थिती लोकांना सांगत होतो. कोटी चुकून बोललो, हे लक्षात आल्यानंतर ती रक्कम लाखात आहे असं मी लगेच सांगितले. संपूर्ण खर्च पक्षाने दिला. आम्ही जेवढे लागेल तेवढे खर्च केले आणि बाकीचे पैसे पक्षाला परत दिलेत असं आमदार प्रकाश सोळंके यांनी सांगितले.
काय होतं 'ते' विधान?
बीडमधील एका कार्यक्रमात आमदार प्रकाश सोळंके बोलत होते. निवडणूक आली की किती उमेदवार त्यात उभे राहतात त्याला काही मोजमाप नाही. कुणीही येते आणि उभं राहते. कुणीही येते पैशाच्या मस्तीत उभं राहते अशी दुर्दैवाने परिस्थिती झाली आहे. मागच्या निवडणुकीत एका उमेदवाराने ४५ कोटी खर्च केले असं ऐकिवात आहे. लोक बोलतात ते मी सांगतो, मला माहिती नाही. एकाने ३५ कोटी खर्च केले असं ऐकले, मी १०-१२ कोटीपर्यंत मर्यादित राहिलो पण निवडून आलो असं विधान त्यांनी केले, ते विधान सोशल मीडियावर व्हायरल होताच आता त्यांनी त्यावर स्पष्टीकरण दिले आहे.
राष्ट्रवादीचे २ आमदार आधीच अडचणीत
दरम्यान, बीडमधील संतोष देशमुख प्रकरणी चर्चेत असलेले धनंजय मुंडे आणि नाशिक येथे फसवणुकीच्या प्रकरणात कोर्टाने दोषी ठरवलेले माणिकराव कोकाटे हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे २ आमदार आधीच अडचणीत आहेत. संतोष देशमुख प्रकरणात वादात अडकलेल्या धनंजय मुंडे यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला वरिष्ठ कोर्टाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे तूर्तास त्यांच्या मंत्रिपदाला कुठलाही धोका नाही. त्यातच प्रकाश सोळंके यांच्या विधानामुळे तेदेखील चांगलेच गोत्यात आले.