मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 06:16 IST2025-07-19T06:15:14+5:302025-07-19T06:16:01+5:30
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहातील चर्चेला उत्तर दिल्यानंतर त्यावर बोलण्यासाठी आग्रही असलेले भास्कर जाधव यांनी जी विधाने केली, त्याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे, असा आग्रह शंभूराज देसाई यांनी धरला

मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विधानसभेतील अभ्यासू सदस्य, उद्धवसेनेचे भास्कर जाधव यांनी सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांसाठी शुक्रवारी सभागृहात माफी मागितली. कालच्या या विधानांबद्दलचा मुद्दा मंत्री शंभूराज देसाई यांनी सभागृहात उपस्थित केला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहातील चर्चेला उत्तर दिल्यानंतर त्यावर बोलण्यासाठी आग्रही असलेले भास्कर जाधव यांनी जी विधाने केली, त्याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे, असा आग्रह शंभूराज देसाई यांनी धरला. शिवाय, आदित्य ठाकरे यांची विधाने आणि वर्तनावरही त्यांनी टीका केली. अश्लील हातवारे करणे, बसल्याजागी टोमणे मारणे, असे प्रकार घडले. अध्यक्षांबद्दल सभागृहात आणि बाहेरही जी टिप्पणी केली, ती अध्यक्षांचा अवमान करणारी होती, असे देसाई म्हणाले. दोघांनी माफी मागावी किंवा अध्यक्षांनी निलंबित करावे, अशी मागणी केली.
शिक्षण मंत्री दादा भुसे म्हणाले, ज्यांचे दुधाचे दातही अजून गेले नाहीत, तेही आवेशाने बोलू लागले आहेत. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार म्हणाले, भास्कर जाधव यांच्याकडून आक्रस्ताळेपणाची अपेक्षा नाही. तसेच ज्यांचे वडील मुख्यमंत्री होते, ते बसून बोलतात, टोमणे मारतात, हे योग्य नाही. सभागृहात असे जे घडते, त्याचे पडसाद बाहेर उमटू शकतात आणि त्याचा स्फोटही होऊ शकतो, असेही ते म्हणाले.
असा प्रमाद माझ्या हातून घडायला नको होता
मी बाहेर मीडियासमोर जे बोललो, ते मी रात्री घरी जाऊन बघितले. मी तसे बोलायला नको होते. मी नियमांचा आग्रह धरणारा सदस्य असताना असा प्रमाद माझ्या हातून घडायला नको होता, हे मी मान्य करतो. त्यासाठी अध्यक्ष करतील ती शिक्षा मला मान्य असेल, असे भास्कर जाधव यावेळी म्हणाले.
सभागृहातील आपले आजवरचे वर्तन नियमांना सोडून कधीही नव्हते. मी कधीही असंसदीय शब्द वापरला नाही, माफीचा प्रसंग माझ्यावर आला नाही. कालही मला बोलू द्या, असाच माझा आग्रह होता, असे ते म्हणाले. सभागृहाबाहेरील विधानांसाठी माफी मागितली, तशी सभागृहातील विधानांसाठीही मागा, अशी मागणी सत्तारूढ सदस्य, मंत्र्यांनी यावेळी केली. ती मान्य करत जाधव यांनी माफी मागितली. असे बोलताना ते भावुक झाले.