"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 17:57 IST2025-11-03T17:55:09+5:302025-11-03T17:57:59+5:30
Balaji Kalyankar Nanded: एकनाथ शिंदेंनी बंड केलं. त्यांच्यासोबत जे आमदार गुवाहाटीला गेले होते, त्यात एक होते बालाजी कल्याणकर... पण, तिथे गेल्यानंतर बालाजी कल्याणकरांच्या मनात स्वतःला संपवण्याचे विचार सुरू होते. त्याबद्दल मंत्री संजय शिरसाटांनी पहिल्यांदाच गौप्यस्फोट केला.

"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
Balaji Kalyankar News: "दोन माणसं आम्ही बालाजी कल्याणकरसोबतच ठेवायचो. त्याने पाऊल ठेवलं की माणूस अलर्ट व्हायचा", असे म्हणत कॅबिनेट मंत्री संजय शिरसाटांनीएकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंडातील बालाजी कल्याणकरांचा किस्सा सांगितला. बालाजी कल्याणकर गुवाहाटीत असताना हॉटेलमधून उडी मारणार असे म्हणत होते. जेव्हा बालाजी कल्याणकरांना विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी त्यावेळी डोक्यात काय सुरू होते आणि कसे त्यांना कुणी धीर दिला, याबद्दल सांगितलं.
बालाजी कल्याणकर म्हणाले, "शिरसाटांनी सांगितलं की, दोन दिवस मी जेवण केलं नाही. ते खरंच आहे. मी दोन-तीन दिवस वाईट मनस्थितीत होतो. ज्यावेळी मला विनंती करत होते, तेव्हा मी म्हटलं की, मी इथून हॉटेलवरून उडी मारेन आणि मी मला संपवून टाकेन. कारण तसे विचारच माझे झाले होते."
बालाजी कल्याणकर म्हणाले, "पण शिंदे साहेबांनी मला ताकद दिली. ते मला म्हणाले की, बालाजी अडीच वर्षे जनतेची कामे करण्यासाठी तुझ्यासोबत आहे. मी जोपर्यंत आहे, बालाजी मी तुझ्यासोबत राहीन. जेव्हा आम्ही उठाव केला, आमच्या घरावर दगडफेक केली. आमच्या अंत्ययात्रा काढल्या. दारू पिऊन लोक घरी आले. त्यावेळी मी खूप चिंतेत होतो. त्यावेळी एकनाथ शिंदेंनी साथ दिली."
बालाजी कल्याणकरांच्या मनात काय सुरू होतं?
"मनात एकच होतं की, जनतेनं निवडून दिलं. आमदार केलं आणि मी जनतेशी बेईमानी कशी करणार, अशी द्विधा मनस्थिती झाली होती. जनतेची कामे झाली पाहिजेत, हेही बरोबर आहे. मग आम्ही उठाव केला. एकनाथ शिंदेंसोबत राहिलो", असे बालाजी कल्याणकर म्हणाले.
शिरसाटांनी सांगितला कल्याणकरांचा उडी मारण्याचा किस्सा
एका कार्यक्रमात बोलताना शिरसाट म्हणाले, "जेव्हा आम्ही बंडखोरी केली. त्यावेळी आम्ही यालाही (बालाजी कल्याणकर) घेऊन गेलो होतो. याची आमदारकीची पहिली वेळ होती. आम्ही झटके खाल्लेले लोक. माझी तिसरी वेळ होती, याची पहिली वेळ. आयला चुकून झालोय आमदार आणि हे आम्हाला घेऊन चाललेत. मतदारसंघात गेलो तर काय होईल. आमदारकी रद्द झाली तर काय होईल? आलेली संधी गेली. जेवतच नव्हता. मग त्याला सांगायचो, बालाजी खा रे बाबा. तो म्हणायचा नाही साहेब. अरे बालाजी असे नाहीये. आम्ही पण हिंमत केली. ४२ वर्षे राजकारणात आहोत. तू पहिल्यांदा निवडून आलास. आम्हीही राजकीय आयुष्य पणाला लावले आहे. तू खा रे बाबा. तो म्हणायचा नाही साहेब. आम्ही म्हणालो, तू नाही जेवला, तर तसा मरशील. खाऊन तर मर. एकदा तर म्हणाला हॉटेलच्या वरून उडीच मारतो. आता आम्हाला संख्या मोजायचं पडलेले आणि याला उडी खायचे पडलेले. आम्ही बहुमतात आलो नसतो, तर आमचीही आमदारकी रद्द झाली असती. मग दोन माणसं आम्ही त्याच्यासोबतच ठेवायचो."