"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 12:46 IST2025-09-30T12:43:06+5:302025-09-30T12:46:33+5:30
Nitin Gadkari latest News: गेल्या काही दिवसांपासून इथेनॉल मिश्रित पेट्रोलचा मुद्दा चर्चेत आहे. त्यातच अंजली दमानियांनी नितीन गडकरींवर आरोप केले. या दोन्ही मुद्द्यांवर गडकरींनी खुलासा केला.

"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
Nitin Gadkari: इथेनॉल मिश्रित पेट्रोलचा मुद्दा गाजत असतानाच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर आरोप केले. नितीन गडकरींनी पैसे घेतल्याचे त्या म्हणाल्या. गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या आरोपांवर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी मौन सोडलं. एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, 'मी एकाही कंत्राटदाराकडून कधी एक रुपयाही घेतला नाही.'
एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी म्हणाले, "माझी जी गाडी आहे इनोव्हा, ही शेतकऱ्याने धानाच्या कणीपासून, मक्यापासून, ऊसाच्या रसापासून तयार होणार्या इथेनॉलवर शंभर टक्के चालते. आता शेतकऱ्याला फायदा मिळाला. प्रदूषण कमी झालं. पण, २२ लाख कोटी रुपये या देशातील बाहेर जात होते आणि ज्यामुळे प्रदूषण तयार करणाऱ्या इंधनाची आयात होत होती. त्या लोकांचा धंदा मारला गेला, मग ते माझ्यावर नाराज नाही होणार का?", असा सवाल करत गडकरींनी इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या मुद्द्यावर उत्तर दिले.
"...म्हणून मला कंत्राटदार घाबरतात"
"ते नाराज झाले, तर त्यांनी पेड न्यूज (पैसे देऊन बातम्या छापून आणणे) सुरू केल्या. पण, काही चिंता करू नका. तुमच्या सगळ्याचं प्रेम माझ्याकडे आहे. मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून एक रुपया कधी घेतला नाही. म्हणून कंत्राटदार मला घाबरतात", असा खुलासा नितीन गडकरींनी केला.
"लोक दुसऱ्याची रेषा पुसण्याचा प्रयत्न करताहेत"
"लोकांचा विश्वास आहे, त्यामुळे कुठल्याही प्रकारची खोटी कामे केली नाहीत. येणाऱ्या काळात कुणी कितीही आरोप केले, तरी मी विचलित होत नाही. तुम्ही होऊ नका. जनतेला सत्य माहिती असतं. आता येणाऱ्या काळामध्ये राजकारण हे इर्षा, मत्सर, अंहकाराचा खेळ आहे. आपली रेषा मोठी करण्यापेक्षा दुसऱ्याची पुसली तर आपली मोठी होईल या आशेपोटी अशा प्रकारच्या टीका टिप्पणी लोक करतात", असे उत्तर गडकरींनी त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांना दिले.
"मी अनेकवेळा या संकटातून गेलो आहे. पण, जनता कधी यावर विश्वास ठेवत नाही. मी चिंता करत नाही. तुम्ही माझ्यावर प्रेम व्यक्त केलं. माझ्यावर टीका झाली म्हणून तुम्ही जे दुःख व्यक्त केलं. तुमच्यासारख्या लोकांच्या माझ्याबद्दल असलेल्या सद्भावना हीच माझ्या आयुष्यातील पुंजी आहे", अशा भावना नितीन गडकरींनी व्यक्त केल्या.