मला राजकारणात येण्याची अजिबात इच्छा नव्हती, पण...; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 23:08 IST2025-01-10T23:07:23+5:302025-01-10T23:08:05+5:30
सकाळचा शपथविधी नको म्हणून यावेळी आम्ही सायंकाळी शपथविधी ठेवला असं एका प्रश्नाला उत्तर देतांना फडणवीसांनी सांगितल्यावर सभागृहात हशा पिकला.

मला राजकारणात येण्याची अजिबात इच्छा नव्हती, पण...; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
नागपूर - संयम, सहनशिलता याची अपूर्व देणगी मला राजकारणातून मिळाली असं मी एका अर्थाने समजून घेतो. राजकारणात आल्यानंतर तुम्हाला वाटेल तसे, वेळ प्रसंगी अपशब्दही सहन करावे लागतात. मागील पाच वर्षात काहींनी अनेक पद्धतीने मला अपमानित करण्याचा प्रयत्न केला. यात माझ्या कुटुंबाच्याही वाट्याला बरेच काही आले. ही सहनशक्ती, संयम, एका अर्थाने स्थितप्रज्ञता मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शिकलो असं विधान मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी केले. स्वर्गीय विलास फडणवीस यांच्या जयंतीनिमित्त जिव्हाळा बहुउद्देशिय विकास संस्थेच्या जिव्हाळा पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित प्रकट मुलाखतीत ते बोलत होते. ज्येष्ठ संपादक विवेक घळसासी यांनी मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतली.
या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विद्यार्थी चळवळीत असताना मला राजकारणात येण्याची अजिबात इच्छा नव्हती. एक स्वयंसेवक म्हणून आपल्या परिने समाजाला योगदान द्यायचे हे मी निश्चित केलेले होते. स्वयंसेवकाला जे सांगितले ते त्याने करायचे असते असं विलासजी फडणवीस यांनी सांगून मला काही पर्याय ठेवला नाही. राजकारणात सहनशक्तीचा कस लागतो. समाजात जे काही चांगले दिसले त्यापासून मी शिकत आलो आहे. सामाजिक उत्तरदायित्वाच्या दृष्टीकोनातून जे प्रकल्प हाती घेतले ते त्याच शिकवणुकीतून मी पूर्ण करत आलो. कॅन्सर इन्स्टिट्युट पासून इतर संस्था या समाजाला योगदान देणाऱ्या अशा व्यक्तींप्रतिची एक कृतज्ञता असल्याचं त्यांनी सांगितले.
त्याशिवाय मुख्यमंत्री पदाची संधी मला मधल्या काळात मिळाली होती. आपण ज्या संस्कारातून आलो त्या संस्कारात पदाला महत्व नाही हे मी माझ्या मनावर कायमचे बिंबविले आहे. कोणतेही पद हे आपल्या सुखासाठी नाही तर ज्यांच्यासाठी आपण पदावर आलो त्या घटकांना सुखी करण्याचे पद हे माध्यम आहे अशी माझी मनापासून धारणा आहे. या धारणेमुळे मी तेव्हा उपमुख्यमंत्री पद स्वीकारले नाही. बाहेर राहूनच आपण चांगले काम करु असा माझा त्यावेळी समज होता. परंतु सत्ताबाह्य राहून लोकशाहीला अभिप्रेत नसलेल्या केंद्रातून कामे करण्यापेक्षा सत्तेत उपमुख्यमंत्री राहून लोकशाहीच्या मूल्यात्मक आदरापोटी ती जबाबदारी स्वीकारली असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं.
दरम्यान, महाराष्ट्राची राजकीय संस्कृती ही आपण आणली पाहिजे. सर्वसामान्यांचा राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा अधिक सकारात्मक, आश्वासक झाला पाहिजे यादृष्टीने मी आता मुख्यमंत्री झाल्यानंतर अगोदर हे जाहीर केले आहे . कोणत्याही खोट्या आरोपातून केलेल्या नकारात्मक वातावरणाला आता समाज मान्यता देत नाही हे या निवडणुकीतून सिध्द झालं. एका दृष्टीने कलुषित झालेल्या राजकारणाला लोकांनीच शुद्ध करण्याकरता घेतलेला हा पुढाकार आहे. राजकारणात कोणीही कायमचे शत्रू नसतात. राजकारणात काहीही होऊ शकते. सकाळचा शपथविधी नको म्हणून यावेळी आम्ही सायंकाळी शपथविधी ठेवला असं एका प्रश्नाला उत्तर देतांना फडणवीसांनी सांगितल्यावर सभागृहात हशा पिकला.