नागपूर: माणूस जातीनं मोठा होत नाही. आमच्या पक्षात जातीचं राजकारण चालत नाही. त्यामुळेच नगरपालिका आणि ग्रामपंचायतींमध्येही आज आमची सत्ता आहे, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं. मी जात-पात मानत नाही आणि त्यासाठी कोणी माझ्याकडे आलं, तर त्याला प्रतिसादही देत नाही, असंही गडकरींनी स्पष्ट केलं. ते भाजपाच्या अनुसूचित जाती-जमाती आघाडीच्या राष्ट्रीय परिषदेत बोलत होते. नागपुरातील अनुसूचित समाज कायम भाजपासोबत राहिला. कारण आम्ही जातीचं राजकारण करत नाही, असं गडकरी म्हणाले. भाजपा केवळ उच्च जातीच्या लोकांचा पक्ष असल्याचा भ्रम काँग्रेसनं पसरवला. भाजपामध्ये अस्पृश्यता पाळली जाते, असा अपप्रचार काँग्रेसनं केला. मात्र आम्ही सामाजिक समानता मानतो आणि त्याच धोरणांवर काम करतो. समाजातून जाती प्रथा नष्ट व्हायला हवी. अस्पृश्यता संपायला हवी, असं मला वाटतं. मी कधीही जाती-धर्माचा विचार करत नाही, असंदेखील त्यांनी सांगितलं. काँग्रेसनं बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अन्याय केल्याचं नितीन गडकरी म्हणाले. 'बाबासाहेबांनी धम्म स्वीकारण्यासाठी नागपूरची निवड केली. त्यांनी भंडारा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली. मात्र काँग्रेसनं त्यांच्याविरोधात उमेदवार दिला आणि त्यांचा पराभव केला,' असं गडकरी म्हणाले. काँग्रेसनं बाबासाहेबांच्या स्मारकाच्या कामातही दिरंगाई केली, असंदेखील ते म्हणाले. 'इंदूमिलमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा प्रश्न काँग्रेसनं सोडवला नाही. मात्र देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री होताच तो प्रश्न मार्गी लावला,' असंही गडकरींनी म्हटलं.
जातीवरुन माणसाचं मोठेपण ठरत नाही- गडकरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2019 17:48 IST