राजन साळवींना मी फोन केला नाही, त्यांचाच आला, वैभवलाही...; रामदास कदमांचे सुतोवाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 15:50 IST2025-02-13T15:49:51+5:302025-02-13T15:50:12+5:30
कुडाळ-मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी साळवींनी ठाकरे शिवसेना का सोडली ते सांगितले. तसेच शरद पवारांसोबतच्या आघाडीवरून देखील खडेबोल सुनावले आहेत.

राजन साळवींना मी फोन केला नाही, त्यांचाच आला, वैभवलाही...; रामदास कदमांचे सुतोवाच
राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटाचा हात पकडल्याने कोकण पट्ट्यात ठाकरे गटात खळबळ उडाली आहे. तिकडे कुडाळ-मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी साळवींनी ठाकरे शिवसेना का सोडली ते सांगितले. तसेच शरद पवारांसोबतच्या आघाडीवरून देखील खडेबोल सुनावले आहेत. अशातच शिंदे शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी सूचक वक्तव्य केले आहे.
राजन यांनी योग्य वेळेला योग्य निर्णय घेतला आहे, उद्धव ठाकरेंना मी शेवटपर्यंत साथ देण्याचा प्रयत्न केला. पण आज त्यांच्याकडे सगळे संपलेले आहे, हे त्यांनी महाराष्ट्राला दाखवून दिले. काल मला त्याचा फोन आला होता. आम्ही जेव्हा निर्णय घेतला तेव्हा आमच्यासोबत या म्हणून फोन केला नव्हता. त्यावेळी बोललो असतो तर बदल झाला असता. पण काल भाई मी तुमच्यासोबत येतोय, माझ्यावर लक्ष ठेवा, असे सांगायला फोन केलेला. मी त्याला काही काळजी करू नको असे सांगितले आहे. एवढेच नाही तर वैभव नाईक आणि माझेही संबंध जवळचे आहेत, पण मी त्याला आतापर्यंत कधीही फोन केला नाही, असे सुतोवाच रामदास कदम यांनी दिले आहेत.
वैभव नाईक यांनी साळवींच्या पक्षप्रवेशावर बोलताना आपण ठाकरे गटातच राहून शिवसेना वाढविणार असल्याचे स्पष्ट केले आहे. परंतू, रामदास कदमांच्या या वक्तव्याने राजकीय आडाखे बांधण्यास सुरुवात झाली आहे.
उद्धव ठाकरेंसोबत कोणीच शिल्लक राहणार नाही हे मी आधीच सांगितले होते. राजन साळवींचा पक्षप्रवेश म्हणजे उद्धव ठाकरेंच्या सणसणीत राजकीय चपराक लावली आहे. अजून पुष्कळ लोक प्रवेशासाठी रांगेत उभे आहेत. हम दो हमारे दो एवढेच शिल्लक राहणार मातोश्रीकडे, असा इशाराही कदम यांनी दिला.
कधी कधी सत्य हे पचत नसते, तशी अवस्था संजय राऊत आणि विनायक राऊत यांची झाली आहे. जे वास्तव आहे ते शरद पवार बोलले. वास्तव नसते तर शिंदे यांना हा दिवस मिळाला नसता. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांचे वैचारिक मतभेद नव्हते. शरद पवारांचा अभ्यास दांडगा आहे, प्रचंड आहे. आपण कोणावर काय बोलतो याचं भान संजय राऊत यांनी ठेवलं पाहिजे, असा सल्ला कदम यांनी राऊतांना दिला आहे.