शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 10:30 IST2025-08-04T10:29:48+5:302025-08-04T10:30:19+5:30
बँकेच्या निवडणुकांमुळे स्थानिक पातळीवर भाजपा आणि शिंदेसेनेत वाद उफाळून आलेत.

शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
भंडारा - भारतीय जनता पार्टीचे आमदार परिणय फुके यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत वाद उफाळण्याची शक्यता आहे. शिंदेसेनेचे नेते यांनी परिणय फुके यांच्या विधानावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जर १२ तासांत माफी मागितली नाही तर शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ असा इशारा त्यांनी दिला आहे. शिवसेना बाप मीच आहे असं विधान फुके यांनी त्यांच्या कार्यक्रमात केले होते. त्यावरून हा वाद पेटला आहे.
आमदार परिणय फुके म्हणाले की, माझ्यावर अनेक लोक आरोप करतात. मी कुठल्याही आरोपाला उत्तर देत नाही. परंतु त्यादिवशी माझ्या चांगले लक्षात आले, जर एखादा मुलगा परीक्षेत चांगले मार्क्स मिळवत असेल तर त्याची नाहीतर आईचं कौतुक केले जाते. काही चांगले झाले तर आईने केले किंवा त्या मुलाने केले. याउलट जर काही वाईट झाले तर दोष बापावर केला जातो. त्यामुळे मला पक्कं माहिती झालं, शिवसेनेचा बाप मीच आहे. खापर माझ्यावर फोडले जाते असं त्यांनी विधान केले.
तर शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे शिवसेनेचे पिता आहेत. कुणीही आमचा बाप होण्याचा प्रयत्न करू नका. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत फुके यांनी शिवसेना उमेदवार प्रकाश मालगावे यांना हरवण्याचं काम केले. त्यांनीच काँग्रेसच्या उमेदवाराला ६ मते देण्याचा डाव खेळला. त्यामुळे सेनेच्या उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला. आता फुके यांनी शिवसेनेबद्दल अपमानकारक शब्दाचा वापर केल्याने कार्यकर्त्यांचे मन दुखावले गेले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा नेत्यांना आवर घालावा नाहीतर शिवसेनेचा बाप कोण हे आम्ही दाखवून देऊ असा इशारा शिंदेसेनेचे लोकसभा प्रमुख संजय कुंभलकर यांनी दिला आहे.
बँकेच्या निवडणुकांमुळे स्थानिक पातळीवर भाजपा आणि शिंदेसेनेत वाद उफाळून आलेत. त्यात भंडारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला. त्यात शिंदेसेनेने भाजपा आमदार परिणय फुके यांच्यावर आरोप केले. शिंदेसेनेच्या या आरोपांना उत्तर देताना फुके यांनी स्थानिक आमदार नरेंद्र भोडेंकर यांच्यावर निशाणा साधला. "मौका देने वाले को धोका आणि धोका देने वाले को मौका कभी नही देता.." ज्यांनी पक्षासाठी काम केले अशा कार्यकर्त्यांसाठी मी अर्ध्या रात्रीसुद्धा उपस्थित आहे परंतु ज्यांनी मला धोका दिला, त्यांना मात्र मी सोडत नाही असंही फुके यांनी म्हटलं आहे.