Maharashtra Politics ( Marathi News ) : गेल्या काही दिवसापासून भाजपा नेते आमदार गोपीचंद पडळकर यांना मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा सुरू होती. पण, त्यांना मंत्रिपद मिळेलेले नाही. रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये मंत्रिमंडळाचा रविवारी विस्तार झाला. यात ३९ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. पण यात गोपीचंद पडळकर यांच्या नावाचा समावेश नाही. यामुळे आता पडळकर नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या, पडळकर यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर उघड नाराजी व्यक्त केली होती. पडळकर काही दिवसापासून माध्यमांसमोरही आले नव्हते. दरम्यान, आज ते हिवाळी अधिवेशनासाठी दाखल झाले आहेत.यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला.
आमदार गोपीचंद पडळकर यांनी मंत्रिपद मिळाले नाही म्हणून नाराज नाही असं स्पष्ट केलं. मंत्रिपद मिळावी ही कार्यकर्त्यांची भावना होती. मी आजही देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच असल्याची माहिती पडळकर यांनी दिली.
आमदार पडळकर म्हणाले, मला भारतीय जनता पार्टीचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. भाजपाने मला २०२० मध्ये विधान परिषदेमध्ये संधी दिली. त्या संधीच मी सोनं केलं. सर्वसामान्यांचे प्रश्न मी विधान परिषदेत लावून धरले. परिषदेच्या बाहेर रस्त्यावरची लढाई मी लढलेलो आहे, नंतर मला पक्षाने जत विधानसभेतून लढण्यासाठी संधी दिली. माझा खानापूर मतदारसंघ आहे. माझा मतदारसंघ सोडून मला भाजपाने जत विधानसभा संघात उमेदवारी दिली. तिथल्या जनतेने मला निवडून दिले आहे. आता मी नाराज असायचा प्रश्न नाही, पण ज्या लोकांसाठी मी काम केलं त्या लोकांची इच्छा मला मंत्रिपद मिळावे अशी अपेक्षा होती. पण पक्षाने जो निर्णय घेतला आहे तो मला मान्य आहे, असंही गोपीचंद पडळकर म्हणाले.
" मी नाराज नाही, मी यापुढेही काम करत राहणार आहे. कार्यकर्त्यांच्या भावना होत्या. पण पक्षाने विचार करुनच निर्णय घेतला असेल. त्यामुळे कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा ही माझी विनंती आहे, असंही पडळकर म्हणाले. मारकडवाडीमुळे आम्हाला मंत्रिपद मिळाले नाही असं काही वाटत नाही.
आमदार पडळकर म्हणाले, छगन भुजबळ वरिष्ठ नेते आहेत. त्यांनी ओबीसी समाजाची बाजू घेतली होती. त्यांना मंत्रिपद मिळाले नाही म्हणून समाजातील काही मंडळी नाराज आहेत. पण, ते भाजपामधील नाहीत त्यामुळे मी काही बोलू शकत नाही.