हायपरलूपद्वारे पुणे ते मुंबई प्रवास आता 20 मिनिटांत होणार पूर्ण- रिचर्ड ब्रॅन्सन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2018 03:09 IST2018-02-18T19:27:18+5:302018-02-19T03:09:30+5:30
पुणे-मुंबई दरम्यान हायपरलूप या अतिजलद प्रवासाची सुविधा विकसित करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि लॉस एंजेल्स येथील हायपर लूप कंपनीबरोबर सामंजस्य करार झाला.

हायपरलूपद्वारे पुणे ते मुंबई प्रवास आता 20 मिनिटांत होणार पूर्ण- रिचर्ड ब्रॅन्सन
मुंबई- पुणे-मुंबई दरम्यान हायपरलूप या अतिजलद प्रवासाची सुविधा विकसित करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि लॉस एंजेल्स येथील हायपरलूप कंपनीबरोबर सामंजस्य करार केला. या करारावर व्हर्जिन समूहाचे संस्थापक रिचर्ड ब्रॅन्सन यांनी भाष्य केलं आहे. पुणे ते मुंबई हा प्रवास 20 मिनिटांत पूर्ण होणार आहे. पुण्याहून मुंबई आणि नवी मुंबई विमानतळापर्यंतचा प्रवास 20 मिनिटांत शक्य होणार असून, त्यासाठी मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळासाठी हायपरलूप प्रवासी व्यवस्था उभारण्यात येणार आहे. देशातील प्रमुख शहरे दोन तासांत हायपरलूपने जोडली जाणार असून, त्याचा दरवर्षी 15 कोटी प्रवाशांना फायदा होणार आहे, असंही रिचर्ड ब्रॅन्सन म्हणाले आहेत.
हायपर लूप ही अत्याधुनिक प्रणाली
हायपर लूप हा वाहतुकीचा नवीन प्रकार असून, कमी दाबाच्या निर्वात पोकळीमधून इलेक्टो-चुंबकीय प्रणोदकांमधून वाहतूक केली जाते. या प्रणालीद्वारे एका तासात १ हजार ८० कि. मी. वेगानेही प्रवास करता येतो. हायपरलूप ही कार्यक्षम, सुरक्षित व विश्वासार्ह वाहतूक प्रणाली आहे. पीएमआरडीएने केलेल्या सामंजस्य करारानुसार पुणे-मुंबई विभागातील मार्गांचे पूर्व व्यवहार्यता अभ्यास (प्री-फिजिबिलीटी स्टडी)अहवाल तयार करून हायपरलूप आधारित प्रवासी ट्रॅफिक सिस्टीम कार्यान्वित करण्याचा शासनाचा मानस आहे. त्यादृष्टीने तपासणी करून अहवाल तयार करण्यासाठी हा करार करण्यात आला. सध्या हायपर लूप आधारित ट्रांजिट प्रोजेक्टस नेदरलँडमध्ये, अबू धाबी ते दुबई आणि स्टॉकहोम ते हेलसिंकी येथे चालू आहे. भारतात महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश यांच्यात करार झाले आहेत. विजयवाडा आणि अमरावती या शहरांसाठी पूर्व व्यवहार्यता अभ्यास अहवाल तयार करण्यात आला आहे.