डीजे तालावर नाचत बसला नवरा, तिने निवडला 'दुसरा'; इतका उशीर होईल वाटले नव्हते
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 09:14 IST2022-04-26T09:13:16+5:302022-04-26T09:14:04+5:30
मलकापूर पांग्रा येथील हा विवाह साेहळा सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. डीजेच्या तालावर थिरकणाऱ्या मित्रांच्या नादात एका नवरदेवावर नवरीच गमावण्याची वेळ आली.

डीजे तालावर नाचत बसला नवरा, तिने निवडला 'दुसरा'; इतका उशीर होईल वाटले नव्हते
सिंदखेडराजा (जि. बुलडाणा) : ती मंडपात त्याच्या आगमनाकडे डोळे लावून बसलेली. ‘...देर ना हो जाए, कहीं देर ना हो जाए...’ गाणे तिच्या मनात सुरू. पण तो काही यायचे नाव घेईना. कारण तो ‘आवाज वाढव डीजे तुझ्या...’च्या तालावर मित्रांसोबत मनसोक्त थिरकत होता. अखेर मुलीच्या नातेवाईकांनी लग्नच मोडले. इतकेच नव्हे, तर नवरीने चक्क नातेवाईकांनी सुचवलेल्या मंडपातीलच दुसऱ्या मुलाच्या गळ्यात माळही घातली. आता बोला...
मलकापूर पांग्रा येथील हा विवाह साेहळा सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. डीजेच्या तालावर थिरकणाऱ्या मित्रांच्या नादात एका नवरदेवावर नवरीच गमावण्याची वेळ आली. वरात लग्न मंडपात उशिरा पाेहोचल्याने संतप्त झालेल्या वधूकडील मंडळींनी लग्न माेडले. एवढेच नव्हे तर दुसऱ्याच मुलाबराेबर या मुलीचा विवाहही आटाेपला. मलकापूर पांग्रा येथील मुलीचा विवाह कंडारी येथील युवकाबराेबर २२ एप्रिलला ठरला हाेता. दुपारी ३.३० वाजता लग्नाची वेळ होती. त्यापूर्वी वराकडील मंडळी लग्नमंडपात पाेहोचणे अपेक्षित हाेते. मात्र झाले उलटे. पाहुणे उशिरा आले. त्यामुळे लग्नापूर्वी केल्या जाणाऱ्या धार्मिक विधींना अपेक्षेप्रमाणे उशीर झाला. लग्नाच्या वेळेत विधी झाल्याने परण्या निघण्यासदेखील उशीर झाला. इथपर्यंत सर्व काही ठीक होते. मात्र, नवरदेवाची वरात निघाली आणि डीजे, बँडच्या तालावर थिरकणारे नवरदेवाचे मित्र मैदानात उतरले. मद्यधुंद अवस्थेत थिरकण्याच्या नादात दुपारचे लग्न तब्बल चार ते पाच तास उशिराने लागण्याची परिस्थिती निर्माण झाली.
इतर कामांकडे लक्ष दिल्याचा तोटा
लग्न ठरविताना लग्न मुहूर्त काढला जातो, मात्र सध्याच्या परिस्थितीत मुहूर्तावर कुठेच लग्न लागत नाही. नवरदेवाच्या मित्रमंडळींना थिरकायचे असते तर वधूकडील मंडळींना लग्नापेक्षा सत्कार समारंभात अधिक रस असतो. याचा परिणाम लग्न मुहूर्तावर होऊ लागला आहे. याचा विचार दाेन्हीकडील मंडळींनी करण्याची गरज आहे.
लग्न न लावताच परतला नवरदेव
वरात लग्न मंडपात येताच वधूच्या नातेवाइकांनी उशीर का केला, असा प्रश्न विचारला. नंतर दोन्ही बाजूंनी वादविवाद, झटापट झाली. नवरीकडील मंडळींनी जवळच्या पाहुण्यांशी सल्लामसलत करून नवरदेवाला लग्न न लावताच माघारी जाण्याचे फर्मान काढले! अखेर नवरदेवाला लग्न मंडपातून लग्नाशिवाय काढता पाय घ्यावा लागला.