शेकडो टॉयलेट, ११ टँकर, ४५० कर्मचारी; आंदोलकांची गैरसोय टाळण्यासाठी महापालिकेकडून उपाययोजना
By सीमा महांगडे | Updated: August 31, 2025 07:11 IST2025-08-31T07:09:47+5:302025-08-31T07:11:06+5:30
Maratha Kranti Morcha: आंदोलनकर्त्यांची गैरसोय टाळण्यासाठी मुंबई महापालिकेकडून पुढाकार घेऊन पिण्याच्या पाण्यापासून ते स्वच्छतागृहापर्यंतच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

शेकडो टॉयलेट, ११ टँकर, ४५० कर्मचारी; आंदोलकांची गैरसोय टाळण्यासाठी महापालिकेकडून उपाययोजना
सीमा महांगडे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्रभरातून हजारो आंदोलनकर्ते मुंबईत शुक्रवारी दाखल झाले. त्यातच पावसाने हजेरी लावल्याने आंदोलकांचे हाल झाले. दरम्यान, आंदोलनकर्त्यांची गैरसोय टाळण्यासाठी मुंबई महापालिकेकडून पुढाकार घेऊन पिण्याच्या पाण्यापासून ते स्वच्छतागृहापर्यंतच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. सततच्या पावसामुळे आझाद मैदानात चिखल व अस्वच्छता निर्माण झाली, मात्र पालिकेने चिखल हटवून प्रवेश मार्गावर २ ट्रक खडी टाकून तो मार्ग येण्या जाण्यासाठी समतल करून घेतल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले.
महापालिका मुख्यालयासमोरील आझाद मैदान येथे राज्यभरातून आलेल्या मराठा आंदोलकांची संख्या लक्षात घेता, महापालिकेने आवश्यक त्या विविध नागरी सेवा-सुविधा पुरविल्या. पावसामुळे झालेल्या चिखलात आंदोलनकर्त्यांनी गैरसोय लक्षात घेत पालिकेकडून आझाद मैदान व आसपासच्या परिसरात कीटकनाशक फवारणी केली. दरम्यान, आंदोलनकर्त्यांकडून पालिकेकडून उपहारगृहे बंद केल्याचा व पिण्याच्या पाण्याचा पुरवठा बंद केल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, पालिकेकडून या दाव्यांचे खंडन करून कोणाताही पाणी पुरवठा रोखलेला नसल्याचे स्पष्ट केले आहे. या भागातल्या दुकानदारांनी गर्दी आणि भीतीपोटी आपापले व्यवसाय बंद ठेवले असेही एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले. रात्री आझाद मैदानावर अंधार होता तो दूर व्हावा म्हणून अग्निशमन दलाच्या गाड्यांवर मोठे लाइट्स लावल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
आझाद मैदानातील मोर्चेकऱ्यांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने पुरविलेल्या नागरी सेवा - सुविधा..@SurekhaRokde14https://t.co/8TsgXUY087pic.twitter.com/2TD34xNEZU
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) August 30, 2025
पालिकेने पुरवलेल्या सुविधा
आझाद मैदान व आजूबाजूच्या परिसरातील ‘पैसे घ्या व वापरा’ तत्त्वावरील सर्व सार्वजनिक शौचालये आंदोलकांच्या वापरासाठी मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहेत. आझाद मैदानाच्या आतल्या बाजूस एकूण २९ शौचकुपे असणारे शौचालयही आंदोलकांच्या वापरासाठी विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच, लगतच्या महात्मा गांधी मार्गावर प्रत्येकी १० शौचकुपे असणारी एकूण तीन फिरती शौचालये उपलब्ध करण्यात आली आहेत. कार्यकारी अभियंता (परिवहन) (पश्चिम उपनगरे) यांच्या कार्यालयामार्फत आझाद मैदानातील मेट्रो परिसराजवळ एकूण १२ फिरती (पोर्टेबल) शौचालये उपलब्ध करण्यात आली असून, आणखी शौचालयांची सोय करण्यात येणार आहे. फॅशन स्ट्रीट आणि आजूबाजूचं परिसरातही २५० शौचकूप असणारी फिरती शौचालये विनामूल्य वापरासाठी उपलब्ध आहेत. ही याशिवाय आंदोलनस्थळी पिण्याच्या पाण्यासाठी एकूण ११ टँकर्स पुरविण्यात आले होते. त्यानंतरही अतिरिक्त टँकर्स मागविण्यात आले आहेत.
वैद्यकीय सेवाही उपलब्ध
महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत आंदोलनकर्त्यांच्या उपचार व वैद्यकीय तपासणीसाठी वैद्यकीय मदत कक्ष उभारण्यात आला आहे. यासाठी चार वैद्यकीय पथक आणि दोन रुग्णवाहिका मैदान परिसरात २४ तास उपलब्ध आहेत. तसेच १०८ रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. याशिवाय पालिकेकडून आंदोलनस्थळ व संपूर्ण आजूबाजूच्या परिसरात स्वच्छतेसाठी पुरेशा संख्येने कर्मचारी नेमण्यात आले आहेत. पालिकेच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडून आंदोलन परिसरात सातत्याने पाहणी आणि देखरेख करण्यात येत आहे.