एचएसआरपी नंबर प्लेट इतर राज्यांपेक्षा महाग, परिवहन मंत्र्यांनी लक्ष देण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 06:39 IST2025-01-14T06:38:51+5:302025-01-14T06:39:27+5:30
आरटीओने एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यासाठी तीन कंपन्यांची नियुक्ती केली आहे.

एचएसआरपी नंबर प्लेट इतर राज्यांपेक्षा महाग, परिवहन मंत्र्यांनी लक्ष देण्याची मागणी
मुंबई: राज्य परिवहन विभागाने (आरटीओ) २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) लावणे बंधनकारक केले आहे. परंतु यासाठी ठरवलेले दर हे मिझोराम वगळून इतर राज्यांपेक्षा अधिक असल्याचे वाहतूकदारांचे म्हणणे आहे. यामध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी वाहतूकदार कोरागप्पा शेट्टी यांनी यांना पत्राद्वारे केली आहे.
आरटीओने एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यासाठी तीन कंपन्यांची नियुक्ती केली आहे. या कंपन्यांना नंबर प्लेट बसविण्यासाठी गाडीच्या प्रकारानुसार दर ठरवून दिले आहेत. यानुसार बाइक आणि ट्रॅक्टरसाठी ४५०, तीन चाकींसाठी ५०० तर अवजड आणि चारचाकी वाहनांसाठी ७४५ असे दर निश्चित करण्यात आले आहेत.
यासोबतच जीएसटी आणि जोडणीचे चार्जेसदेखील द्यावे लागत आहेत. हे दर इतर राज्यांपेक्षा दोन ते तीन पट अधिक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे नागरिकांना याचा भुर्दंड बसणार असून यामध्ये परिवहन मंत्र्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी शेट्टी यांनी पत्राद्वारे केली आहे.
- राज्यात ठरवून दिलेले दर हे जोडणीचे शुल्क आणि जीएसटी मिळून दिसत असल्याने ते जास्त वाटत आहेत. हे दर सर्व अभ्यास करून ठरविण्यात आले आहेत. - विवेक भिमनवार, परिवहन आयुक्त
- परिवहन विभागाने मंत्रिमंडळ स्थापन होण्यापूर्वी घाई गडबडीत एसओपी काढून या संस्थांना नंबर प्लेट लावण्याचे कामकाज पार पाडण्याबाबत परवानगी दिली आहे. या एसओपीमधील नमूद केलेल्या बाबी आणि दर वाहनधारकांची त्रासदायक असल्याने त्या रद्द कराव्यात. - कोरागप्पा शेट्टी, वाहतूकदार
महाराष्ट्रातील दर
बाइक, ट्रॅक्टर ४५०
तीनचाकी ५००
कार ७४५