बारावीच्या रसायनशास्त्राच्या पेपरमधील चुकांमुळे विद्यार्थ्यांना 7 गुणांचा बोनस
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2018 09:31 IST2018-03-13T09:31:55+5:302018-03-13T09:31:55+5:30
रसायनशास्त्राच्या प्रश्नपत्रिकेतील 4 प्रश्न चुकीचे असल्याचे समजते.

बारावीच्या रसायनशास्त्राच्या पेपरमधील चुकांमुळे विद्यार्थ्यांना 7 गुणांचा बोनस
मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या रसायनशास्त्र (केमेस्ट्री) विषयाच्या प्रश्नपत्रिकेत चुका असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांना 7 गुण आयतेच मिळणार आहेत. प्राथमिक माहितीनुसार, रसायनशास्त्राच्या प्रश्नपत्रिकेतील 4 प्रश्न चुकीचे असल्याचे समजते. मात्र, तज्ज्ञ शिक्षकांकडून या प्रश्नपत्रिका तयार करूनही अशा चुका राहतातच कशा, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. या चुकीमुळे आता नाईलाजाने का होईना सर्व विद्यार्थ्यांना 7 गुण मोफत द्यावे लागणार आहेत.
बारावीच्या रसायनशास्त्राच्या पेपरसंदर्भात ही दुसरी मोठी गफलत समोर आली आहे. गेली दोन वर्षे बारावीचा रसायनशास्त्राचा पेपर फुटल्याचा प्रकार समोर आल्यामुळे शिक्षण मंडळाची यापूर्वीच नाचक्की झाली होती. यंदा 28 फेब्रुवारी 2018 रोजी बारावीचा रसायनशास्त्राचा पेपर होता. त्यावेळी परळच्या महर्षी दयानंद महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर आलेला विद्यार्थी परीक्षेपूर्वी महाविद्यालयाच्या स्वच्छतागृहात मोबाईलवर व्यस्त होता. महाविद्यालयातील शिक्षकांना त्याचा संशय आल्यामुळे त्यांनी त्याचा मोबाईल तपासला. त्यावेळी मोबाईलवर 2018चा रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका आढळून आली. या प्रकाराने परीक्षांच्या चोख आयोजनाबाबत पाठ थोपटून घेणाऱ्या शिक्षण मंडळाची चांगलीच नाचक्की झाली होती.