हनुमान मंदिर पाडण्याची नोटीस कशी दिली? उद्धव ठाकरे यांचा सरकारला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 08:39 IST2024-12-14T08:38:50+5:302024-12-14T08:39:03+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजवटीत हनुमानाचे मंदिर पाडले जाण्याची नोटीस येते.

How was the notice to demolish Hanuman temple given? Uddhav Thackeray questions the government | हनुमान मंदिर पाडण्याची नोटीस कशी दिली? उद्धव ठाकरे यांचा सरकारला सवाल

हनुमान मंदिर पाडण्याची नोटीस कशी दिली? उद्धव ठाकरे यांचा सरकारला सवाल

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दादर विभागात ८० वर्षांपासून असलेले हनुमान मंदिर पाडण्याची नोटीस सरकारने पाठविली आहे. रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण केले आहे, असे रेल्वे मंत्रालयाचे म्हणणे आहे. सरकार हमालांनी बांधलेले ८० वर्षांपूर्वीचे मंदिर पाडायला निघाले आहेत. हे कुठले हिंदुत्व आहे? हिंदूंना भयभीत करून त्यांची मते घ्यायची. इतकेच त्यांचे हिंदुत्व शिल्लक उरले आहे का? असा सवाल उद्धवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेतून केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजवटीत हनुमानाचे मंदिर पाडले जाण्याची नोटीस येते. अशा वेळी फडणवीस यांचे हिंदुत्व काय करत आहे? रामाचे मंदिर उभारले; पण त्याच रामभक्त हनुमानचे मंदिर कसे तोडता? ‘एक है तो सेफ है’, म्हणता; पण बांगलादेशातील, मुंबईतील मंदिरे सेफ नाहीत. वन नेशन, वन इलेक्शन सगळे नंतर पाहता येईल; पण आता मंदिरे सुरक्षित नाहीत. हिंदुत्व सोडले असे आम्हाला विचारता, मग तुम्ही हे काय सोडले आहे, अशी टीका ठाकरे यांनी यावेळी केली. बांगलादेशात मंदिरे जाळली जात आहेत. तिथे हिंदूंवर अत्याचार होत आहेत. जे हिंदुत्व, हिंदुत्व करतात त्यांची हिंदुत्वाची व्याख्या काय आहे? भाजपकडे फक्त निवडणुकीपुरते हिंदुत्व उरले आहे का, असा सवाल ठाकरे यांनी केला.

रेल्वेकडून हनुमान मंदिराला नोटीस बजावल्याची माहिती मिळताच प्रत्येक भक्ताच्या वतीने तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. आम्ही कोणत्याही परिस्थितीत मंदिर पाडू देणार नाही. यासाठी लढण्यास पूर्णपणे तयार आहोत
    - प्रकाश कारखानीस, 
    विश्वस्त, हनुमान मंदिर 

हिंदुत्वाविषयी ठाकरेंचे बेगडी प्रेम
उद्धव ठाकरे यांनी हिंदूंविषयी आपल्या भावना व्यक्त करू नयेत, त्यांचे हिंदू आणि हिंदुत्वाविषयीचे प्रेम बेगडी आहे, असे प्रत्युत्तर भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषदेत दिले आहे. ज्यावेळी साधू हत्याकांड झाले त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. त्यावेळी त्यांची काय भूमिका होती ते संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले, असेही ते म्हणाले. 

आधी पाच वेळा नोटीस 
दादर येथील हनुमान मंदिराला याआधी पाचवेळा नोटीस पाठविली त्यावेळी आमचे सरकार नव्हते. आता नोटीस पाठविली म्हणजे मंदिर तोडले असे होत नाही. केंद्र व राज्य सरकार यात लक्ष घालेल आणि निश्चितच मंदिराचे रक्षण करणे किंवा त्यांची पुनर्स्थापना योग्य पद्धतीने करणे, ही आमची जबाबदारी असून, जराही मागे हटणार नाही, असेही दरेकर म्हणाले.

Web Title: How was the notice to demolish Hanuman temple given? Uddhav Thackeray questions the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.