'त्यांनी किती मर्सिडीज दिल्यात?', उद्धव ठाकरेंची माफी मागत संजय राऊत नीलम गोऱ्हेंवर संतापले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 13:45 IST2025-02-23T13:44:17+5:302025-02-23T13:45:04+5:30
विधान परिषदेच्या उप सभापती नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला. त्यांच्या आरोपावर संजय राऊत भडकले, तर उद्धव ठाकरेंनी अधिकच बोलणं टाळलं.

'त्यांनी किती मर्सिडीज दिल्यात?', उद्धव ठाकरेंची माफी मागत संजय राऊत नीलम गोऱ्हेंवर संतापले
दोन मर्सिडीज गाड्या दिल्या की एक पद मिळत होतं, या विधान परिषद उप सभापती नीलम गोऱ्हे यांच्या विधानावर उद्धव ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली. तर खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त करत उलट सवाल केला. उद्धव ठाकरेंनी विरोध असताना चार वेळा आमदार केलं, त्यांनी किती मर्सिडीज दिल्या, असे राऊत म्हणाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मुंबईत उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद झाली. त्यावेळी त्यांना नीलम गोऱ्हेंनी केलेल्या विधानाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.
उद्धव ठाकरेंनी काय दिले उत्तर?
नीलम गोऱ्हेंच्या विधानावर उद्धव ठाकरे म्हणाले, "दाखवा ना मर्सिडीज. जाऊद्या हो, ही गई गुजरी लोक आहेत. त्यांच्याकडे मी काही लक्ष देत नाही. एक महिला म्हणून आदर जरूर आहे. पण, राजकारणात त्यांनी त्यांचं चांगभलं केलेलं आहे. जाऊद्या."
संजय राऊतांचा नीलम गोऱ्हेंना सवाल
उद्धव ठाकरेंनी उत्तर दिल्यानंतर संजय राऊत उद्धव ठाकरेंना म्हणाले, 'माफ करा...' त्यानंतर बोलताना म्हणाले, "माझा एक त्यांना (नीलम गोऱ्हे) एक प्रश्न आहे. त्यांना चार वेळी उद्धव साहेबांनी आमदार केलं. त्यांनी किती वेळा मर्सिडीज दिल्यात? आमच्या महिला आघाडीचा विरोध असताना त्यांना उद्धव साहेबांनी चार वेळा विधान परिषदेचं आमदार केलं. उपसभापती केलं. त्यांनी आठ मर्सिडीज दिल्यात का? असेल तर पावत्या घेऊन याव्यात त्यांनी", असा संताप व्यक्त करत संजय राऊत यांनी उलट सवाल केला.
नीलम गोऱ्हे काय म्हणाल्या?
विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रकट मुलाखत झाली. या मुलाखतीत बोलताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, "२०१२ पासूनचे शिवाजी पार्कवरील सगळे कार्यक्रम मला आठवतात. प्रत्येक सभेला ठाण्याहून माणसे यायची आणि त्यांचीच माणसे कार्यक्रमाचे नियोजन करत होते. आता तपशीलामध्ये जात नाही."
"उद्धव ठाकरे गटाचे लोकही फार समोर नाहीत. त्यामुळे ते असताना मला बोलायला आवडलं असतं. नेत्यांना संपर्कच नको असेल, तर आपण तिथे नकोसे झालोय, हे समजावं. २ मर्सिडीज गाड्या मिळाल्यावर एक पद होते", असा आरोप नीलम गोऱ्हेंनी केला.