Dhananjay Munde vs Anjali Damania, NCP : गेल्या दीड-दोन महिन्यांपासून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. अंजली दमानिया यांनी सरकारी कार्यप्रणालीबाबत मुंडे यांच्यावर आणि त्यांच्या खात्यावर आरोप केले आहेत. तर धनंजय मुंडे यांनी वेळोवेळी या आरोपांचे खंडन केले आहे. त्यातच आता अजित पवारांची राष्ट्रवादी अंजली दमानिया यांच्यावर प्रतिहल्ला चढवण्याच्या तयारीत आहे. नुकतेच अजितदादा गटाने अंजली दमानिया यांना सर्व सरकारी कागदपत्रे इतकी सहज कशी मिळतायत, असा सवाल केला.
"सरकारी कामकाजाची जी कागदपत्रे सहजासहजी उपलब्ध होत नाहीत, अशी गुप्त कागदपत्रे अंजली दमानिया यांना कशी काय मिळतात? ती खरी आहेत की खोटी आहेत याची पोलिसांमार्फत चौकशी करण्यात यावी. इफ्को कडून खरेदी करण्यात आलेली नॅनो युरिया, अटोमॅटीक स्प्रे पंप खरेदी याबाबत आरोप करण्यात आले. त्याचा खुलासा मुंडे यांच्याकडून करण्यात आला. मुंडे यांनी खोटी कागदपत्रे सादर केली आणि मान्यता घेतली असा आरोपही दमानिया यांनी नुकताच केला. त्याचा देखील खुलासा धनंजय मुंडे यांनी केला. अशा परिस्थितीत दमानिया यांच्याकडील कागदपत्रे नक्की कुठली? याचा तपास व्हायला हवा," अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी माध्यमांशी बोलताना केली.
"मंत्रिमंडळ बैठकीचा अजेंडा लीक झाला म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे ज्या कागदपत्रांवर मुख्य सचिवांची, कृषी सचिवांची सही आहे, टिपणी आहे अशा प्रकारच्या कागदपत्रांचा सोर्स आणि त्याची खात्री याचा शोध लागला पाहिजे. लोकशाहीत आरोप करण्याचा अधिकार आहे, परंतु काहीतरी सनसनाटी आरोप जबाबदार मंत्री खोटी कागदपत्रे, खोटी टिपणी तयार करुन २०० कोटीच्या व्यवहाराला मान्यता देतो अशाप्रकारचा जो धादांत खोटा आरोप केला जात आहे, ते आरोप पूर्णपणे चुकीचे आहेत. आम्ही त्याचे खंडन करतो," असेही आनंद परांजपे यांनी स्पष्ट केले.
माणिकराव कोकाटे यांच्याबाबत दिलेल्या निर्णयाबाबत आमचा न्यायालयावर विश्वास आहे. माणिकराव कोकाटे हे मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल करणार आहेत. १९९५ मधील ती केस असून तत्कालीन मंत्री तुकाराम दिघोळे यांनी काही कागदपत्रांमध्ये माणिकराव कोकाटे व त्यांचे बंधू यांनी फेरफार केली अशी तक्रार होती. ३० वर्षानंतर हा अनपेक्षित निकाल आला आहे. कोकाटे हे उच्च न्यायालयात या निर्णयाविरुद्ध अपील दाखल करणार आहेत. त्यामुळे खालच्या कोर्टाने दिलेल्या निकालाला स्थगिती मिळेल असा आम्हाला विश्वास आहे. ही न्यायालयीन प्रक्रिया आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा देण्याचे कारणच नाही," असे आनंद परांजपे यांनी सांगितले.