Congress vs BJP, Pahalgam Terror Attack: "जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी २६ निष्पाप पर्यटकांची हत्या केल्याने देशात दुखवटा पाळला जात आहे. संपूर्ण देश या घटनेने हादरला आहे. जनतेत तीव्र रोष आहे. अशा दुःखद प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे नेते व मंत्री सत्कार सोहळे करून घेत आहेत. हे अत्यंत संताप आणणारे कृत्य असून सत्कार सोहळे करून घेताना भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?" असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला.
"अमरावतीमध्ये २६ तारखेला भाजपा नेत्यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा आहे. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, मंत्री दत्ता भरणे, आमदार गोपीचंद पडळकर आणि इतर नेत्यांचा छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात हा सोहळा होत आहे. पहलगामच्या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला. त्यांच्या चितेची राख विझलेली नाही. या नागरिकांच्या घरी आजही दुःखाचे वातावरण आहे. ते अजून या धक्क्यातून सावरलेले नाहीत. परंतु भाजपा नेते मात्र हार-तुरे घेत आहेत. हीच भाजपाची संस्कृती आहे का?" असा खोचक सवाल अतुल लोंढे यांनी विचारला.
"राम शिंदे हे संवैधानिक पदावर आहेत. या नेत्यांना जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटायला हवी. छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा तरी विचार करायला हवा होता. दुसऱ्याच्या घरी दुःख आहे, त्याचे या भाजपा नेत्यांना काहीच देणेघेणे नाही," अशी टीकाही अतुल लोंढे यांनी केली.