...तर महाराष्ट्र पुरोगामी कसा?

By Admin | Updated: February 21, 2015 22:44 IST2015-02-21T22:44:26+5:302015-02-21T22:44:26+5:30

विवेकी व विज्ञानवादी समाजनिर्मितीसाठी लढणाऱ्यांच्या जेथे हत्या होतात, जिथे दर महिन्याला अंधश्रद्धेपोटी एक नरबळी दिला जातो तो महाराष्ट्र पुरोगामी कसा, असा सवाल मुक्ता दाभोलकर यांनी येथे केला.

But how can the progressive Maharashtra? | ...तर महाराष्ट्र पुरोगामी कसा?

...तर महाराष्ट्र पुरोगामी कसा?

शिरूर : विवेकी व विज्ञानवादी समाजनिर्मितीसाठी लढणाऱ्यांच्या जेथे हत्या होतात, जिथे दर महिन्याला अंधश्रद्धेपोटी एक नरबळी दिला जातो तो महाराष्ट्र पुरोगामी कसा, असा सवाल मुक्ता दाभोलकर यांनी येथे केला.
येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित ‘स्व. धनराज नहार स्मृती व्याख्यानमाले’त दाभोलकर ‘अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीची वाटचाल’ या विषयावर बोलत होत्या. तहसीलदार रघुनाथ पोटे अध्यक्षस्थानी होते. पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर, माजी नगरसेवक संपतलाल नहार, राष्ट्रवादी युवकचे माजी शहराध्यक्ष संतोष मोरे, जीवन विकास मंदिरच्या मुख्याध्यापिका शकुंतला रसाळ आदी विचार मंचावर उपस्थित होते.
दाभोलकर म्हणाल्या, ‘‘फुले, शाहू, आंबेडकरांची जी परंपरा आपण सांगतो त्या परंपरेतून लोकांच्या आयुष्याला भेडसावणारे प्रश्न विवेकी दृष्टिकोनातून हाताळण्याची एक समाजप्रबोधनाची सक्षम परंपरा महाराष्ट्रात रुजलेली आहे. या परंपरेचा विचार घेऊन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ उभी राहिली आहे. १९८९ ला सुरू झालेल्या या चळवळीतून गेल्या २५ वर्षांत अंधश्रद्धा पसरवणाऱ्या ७०० ते ८०० बुवा-बाबांचे धंदे बंद पाडण्यात चळवळीला यश आले आहे.’’
डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी जादूटोणा कायदा अमलात यावा, यासाठी १८ वर्षे लढा दिला. मात्र, हा कायदा विशिष्ट धर्माच्याविरोधात असल्याचा अपप्रचार केला गेला. या अपप्रचाराची मोठी किंमत डॉ. दाभोलकरांना मोजावी लागली. याची खंत मुक्ता दाभोलकरांनी व्यक्त केली. अंधश्रद्धा या विकासविरोधी असून, त्याला कडाडून विरोध केला पाहिजे, असे सांगून दाभोलकर म्हणाल्या, ‘‘श्रद्धा उन्नत व मानवकेंद्रित केली तर समाज बदलू शकेल व अंधश्रद्धा निर्मूलन होऊ शकेल.’’
जयंती उत्सव समितीचे प्रमुख रवींद्र धनक, घोडगंगा कारखान्याचे संचालक पांडुरंगअण्णा थोरात, क्रांतिवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे, समितीचे अ‍ॅड़ ओमप्रकाश सतिजा, विक्रम पाटील, सतीश गवारी, प्रा. दत्ता शिंदे, मंगेश खांडरे, संजय बांडे, अनिल बांडे, संजय कौठाळे, चाँदभाई बळबट्टी, रामा इंगळे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. वजिफा शेख यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

समाजमनात भीती असणे घातक
४समाजात विचार मांडणाऱ्यांच्या मनात भीतीची भावना निर्माण होणे ही गोष्ट लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. ही भावना नष्ट होण्यासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर व गोविंद पानसरे यांचे मारेकरी पकडले गेले पाहिजेत, अशी अपेक्षा मुक्ता दाभोलकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. चार्ली हॅब्दोवर जो हल्ला झाला त्या हल्ल्यातील मारेकऱ्यांना त्या सरकारने ४८ तासांत जेरबंद केले. आपले सरकार मारेकरी पकडण्यात अपयशी ठरत असल्याची खंत दाभोलकरांनी व्यक्त केली.
४महाराष्ट्रातून कायदा व सुव्यवस्था आहे कुठे, असा प्रश्न करून दाभोलकर म्हणाल्या, ‘‘सरकारने डॉ. दाभोलकर व पानसरे यांचे मारेकरी पकडण्यात आता तरी तत्परता दाखवावी.’’

 

Web Title: But how can the progressive Maharashtra?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.