Maharashtra shops hotels to remain open 24 hours: महाराष्ट्रातील नागरिकांना दसऱ्याच्या पूर्वसंध्येला फडणवीस सरकारने एक खुशखबर दिली आहे. राज्यात आता दुकाने, हॉटेल्स आणि इतर आस्थापने २४ तास खुली ठेवता येणार आहेत. परंतु मद्यपानगृहे, बार परमिट रूम, हुक्का पार्लर आणि देशी बार यांच्यावरील निर्बंध मात्र कायम असणार आहे. ही आस्थापने वगळून इतर सर्व आस्थापने आणि दुकाने दिवस-रात्र सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारच्या उद्योग विभागातर्फे हा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाने दुकाने आणि आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, २०१७ अंतर्गत नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार, मद्य विक्री आणि पुरवठा करणाऱ्या आस्थापनांवरील वेळेचे निर्बंध कायम ठेवताना इतर आस्थापने २४ तास खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे स्थानिक प्रशासन आणि पोलिसांकडून हॉटेल्स, आस्थापने आणि दुकाने यांना काही वेळा होत असलेल्या त्रासावर कायमस्वरूपी तोडगा निघणार आहे.
'या' आस्थापनांवर निर्बंध कायम
१९ डिसेंबर २०१७ च्या अधिसूचनेनुसार डान्स बार, परमिट रूम, बिअर बार, हुक्का पार्लर, डिस्कोथेक्स आणि मद्य विक्री करणारी दुकाने उघडण्याच्या आणि बंद करण्याच्या वेळा निश्चित करण्यात आल्या होत्या. ३१ जानेवारी २०२० च्या सुधारित अधिसूचनेने थिएटर आणि सिनेमागृहांना यातून वगळण्यात आले, पण मद्यविक्री संबंधित आस्थापनांवरील वेळेचे बंधन कायम ठेवण्यात आले होते. तेच निर्बंध पुढेही कायम ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे ही आस्थापने २४ तास सुरू ठेवता येणार नाहीत.
आस्थापने सुरू तरीही कर्मचाऱ्यांना सुटी बंधनकारक
अधिनियमाच्या कलम १६ (१) (ख) नुसार, मद्य विक्री वगळता इतर आस्थापने आठवड्याचे सर्व दिवस २४ तास सुरू ठेवता येतील. परंतु कर्मचाऱ्यांना दर आठवड्याला सलग २४ तासांची साप्ताहिक सुटी देणे बंधनकारक आहे. यामुळे रेस्टॉरंट्स, दुकाने, व्यापारी संकुले यांना व्यवसायाच्या संधी वाढतील.
Web Summary : Maharashtra allows shops, hotels to operate 24/7, excluding establishments serving alcohol. Employees must get weekly offs. The decision aims to boost business, resolving previous operational issues.
Web Summary : महाराष्ट्र में शराब परोसने वाले प्रतिष्ठानों को छोड़कर दुकानें, होटल 24 घंटे खुले रहेंगे। कर्मचारियों को साप्ताहिक छुट्टी अनिवार्य है। इस निर्णय से व्यापार को बढ़ावा मिलेगा।