हिवरेबाजारने सुरू केली प्रत्यक्ष शाळा; गाव कोरोनामुक्त झाल्याने निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 06:57 AM2021-06-19T06:57:37+5:302021-06-19T06:58:19+5:30

मुलांचे नुकसान टाळण्यासाठी ग्रामसभेचा पुढाकार . हिवरेबाजारने शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण विभागाकडे अधिकृत परवानगी मागितली होती; मात्र शिक्षण विभागाने काहीही अभिप्राय दिला नाही.

Hiware bazar started a school after corona free village | हिवरेबाजारने सुरू केली प्रत्यक्ष शाळा; गाव कोरोनामुक्त झाल्याने निर्णय

हिवरेबाजारने सुरू केली प्रत्यक्ष शाळा; गाव कोरोनामुक्त झाल्याने निर्णय

Next

सुधीर लंके
लोकमत न्यूज नेटवर्क 
अहमदनगर : राज्यात शासनाने अद्याप शाळा सुरू करण्यासाठी परवानगी दिलेली नाही; मात्र हिवरेबाजारच्या ग्रामसभेने निर्णय घेत आपल्या गावातील पाचवी ते दहावीचे वर्ग प्रत्यक्ष नियमितपणे भरवायला सुरुवात केली आहे. पहिलीचे वर्गही सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

हिवरेबाजारनेशाळा सुरू करण्याबाबत शिक्षण विभागाकडे अधिकृत परवानगी मागितली होती; मात्र शिक्षण विभागाने काहीही अभिप्राय दिला नाही. शाळा बंद ठेवण्याचे धोरण असल्यामुळे अधिकारी जोखीम घेत नाहीत. त्यामुळे हिवरेबाजारच्या ग्रामसभेने पालक, शिक्षक व विद्यार्थी यांच्यात समन्वय साधत शाळा सुरू केली. अनेक पालकांचाच शाळा सुरू करण्याबाबत आग्रह होता. पालकांनी स्वत:च्या जबाबदारीवर मुले शाळेत पाठविण्याची तयारी दर्शविली असल्याचे हिवरेबाजारचे उपसरपंच व राज्याच्या आदर्श गाव समितीचे अध्यक्ष पोपटराव पवार यांनी सांगितले. 

मुले आजारी असतील अथवा घरात कोणी आजारी असेल  तर मुलांना शाळेत पाठवू नका, असे आवाहन ग्रामस्थांना करण्यात आलेले आहे. पाचवी ते सातवीच्या वर्गात १८२, तर आठवी ते दहावीच्या वर्गात ११२ विद्यार्थी असून उपस्थिती सुमारे शंभर टक्के दिसत आहे. 

दहावीची घेणार परीक्षा
दहावीच्या परीक्षा यावर्षी झाल्या नाहीत. हिवरेबाजारच्या माध्यमिक विद्यालयाने मात्र दहावीच्या मुलांना अकरावीत अडचण येऊ नये यासाठी त्यांची शाळेत चाळीस गुणांची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही परीक्षा २५ जूनला होणार आहे. त्यामुळे मुले दहावीचा सराव करून मागील वर्षाची निदान उजळणी करतील हा गावाचा प्रयत्न आहे.  

शिक्षकांना गाव न सोडण्याचे आवाहन 
हिवरेबाजारच्या प्राथमिक शाळेत सात शिक्षक आहेत. त्यापैकी चार शिक्षक गावात राहतात. उर्वरित शिक्षकांनीही गावाबाहेर न जाता त्यांना कोरोना काळात गावातच राहण्याचे आवाहन गावकरी करणार आहेत. तशी सुविधाही देणार आहेत.

असे आहेत नियम 
n शाळेत येताच मुलांची 
प्रथम दररोज आरोग्य तपासणी होते. त्यानंतर शारीरिक अंतर ठेवून मुलांना बसविले जाते. सकाळी १० ते १ या वेळेत वर्ग भरतात. 
n शाळेत जेवणाचे डबे आणू दिले जात नाहीत, तसेच मैदानावर खेळण्यास परवानगी नाही. 
n केवळ वर्गात बसायचे व त्यानंतर गावात कोठेही न थांबता थेट घरी जायचे अशी नियमावली आहे. 

मार्च २०२० पासून शाळा बंद असल्याने मुलांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शासनाची परवानगी नसली तरी हिवरेबाजारने स्वत:च्या जोखमीवर शाळा सुरू केली आहे. कोणत्याही मुलाला काही शारीरिक त्रास झाला तर आजारपणाचा खर्च गाव उचलेल, अशी हमी आम्ही पालकांना दिली आहे.
    - पोपटराव पवार, कार्याध्यक्ष, 
    राज्य आदर्श गाव समिती.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Hiware bazar started a school after corona free village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app