CBSE अभ्यासक्रमात छत्रपती शिवरायांचा इतिहास फक्त ६८ शब्दांत, सत्यजीत तांबेंचा विधानसभेत संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 12:21 IST2025-12-12T12:20:22+5:302025-12-12T12:21:37+5:30
Satyajeet Tambe on CBSE Board: काँग्रेसचे नेते आणि आमदार सत्यजीत तांबे यांनी सीबीएसई बोर्डाच्या अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या उल्लेखावरून विधानसभेत तीव्र संताप व्यक्त केला.

CBSE अभ्यासक्रमात छत्रपती शिवरायांचा इतिहास फक्त ६८ शब्दांत, सत्यजीत तांबेंचा विधानसभेत संताप
काँग्रेसचे नेते आणि आमदार सत्यजीत तांबे यांनी सीबीएसई बोर्डाच्या अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या उल्लेखावरून विधानसभेत तीव्र संताप व्यक्त केला. सीबीएसई बोर्डाच्या अभ्यासक्रमात शिवरायांचा इतिहास केवळ ६८ शब्दांमध्ये संपविण्यात आला असेल तर, सरकारने पेटून उठावे, अशीही त्यांनी मागणी केली आहे.
इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या सीबीएसई बोर्डाच्या अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर फक्त ६८ शब्दांत माहिती असणे, ही संपूर्ण देशातील नागरिकांच्या दृष्टीने खेदाची बाब आहे, असे सत्यजीत तांबे अधिवेशनात बोलताना म्हणाले.
इतर राज्यांबद्दल भरभरून माहिती देण्यात आल्याचा आरोप
"महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या शिवरायांचा इतिहास देशपातळीवर पोहोचू शकत नसेल, तर हे दुर्दैव आहे. शिवरायांव्यतिरिक्त इतर राज्यांबद्दल भरभरून माहिती देण्यात आली आहे. या विषयावर चर्चा करण्यासाठी वारंवार सभागृहात प्रश्न मांडावे लागतात, मला वाटते की, हे शालेय शिक्षण विभागाचे अपयश आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही", असेही तांबे म्हणाले.
सरकारने पेटून उठावे- तांबे
जर सीबीएसई बोर्ड फक्त ६८ शब्दांत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगत असतील तर, सरकारने पेटून उठावे, अशी मागणी त्यांनी केली. "राज्य सरकारने स्वतः अभ्यासक्रम तयार करून सीबीएसई बोर्डाला सादर करायला हवा होता, आम्ही तुम्हाला छत्रपतींचा इतिहास लिहून देतो. तुमच्या अभ्यासक्रमात त्याचा समावेश करा, असा प्रयत्न सरकारने करायला पाहिजे", असे सत्यजीत तांबे म्हणाले.