प्रसारमाध्यमांचे ध्रुवीकरण झाले आहे, हायकोर्टाने सुनावले : पूर्वी पत्रकार तटस्थ होते
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2020 07:07 IST2020-10-24T04:20:14+5:302020-10-24T07:07:29+5:30
मुंबई : प्रसारमाध्यमांचे मोठ्या प्रमाणावर ध्रुवीकरण झाले आहे. यापूर्वी पत्रकार तटस्थ आणि जबाबदार होते, अशी टिप्पणी उच्च न्यायालयाने शुक्रवारी ...

प्रसारमाध्यमांचे ध्रुवीकरण झाले आहे, हायकोर्टाने सुनावले : पूर्वी पत्रकार तटस्थ होते
मुंबई : प्रसारमाध्यमांचे मोठ्या प्रमाणावर ध्रुवीकरण झाले आहे. यापूर्वी पत्रकार तटस्थ आणि जबाबदार होते, अशी टिप्पणी उच्च न्यायालयाने शुक्रवारी अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणावरील सुनावणी घेताना केली.
‘नियंत्रण ठेवण्याचा प्रश्न नाही. मर्यादा कुठे पाळायच्या, हे लोक विसरून गेले आहेत. तुम्हाला सरकारवर टीका करायची आहे, करा ! पण, येथे आरोप असा आहे की, एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे आणि तुम्ही तपासात हस्तक्षेप करत आहात,’ असेही न्यायालयाने म्हटले.
सुशांतसिंहप्रकरणी ‘मीडिया ट्रायल’ होऊ नये व तपास सुरू असताना माध्यमांनी त्यात हस्तक्षेप करू नये, यासाठी उच्च न्यायालयात अनेक जनहित याचिका दाखल आहेत. त्यावरील सुनावणी मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे होती. सुनावणीत ‘झी न्यूज’ या वृत्तवाहिनीची बाजू ऐकताना न्यायालयाने वरील टिप्पणी केली.
‘या देशात कायद्याचे राज्य आहे, बरोबर? मग इतरांना दोष देत फिरणारी व्यक्ती माध्यमांच्या स्वातंत्र्याचा आश्रय घेतेच कशी?’ असा सवाल न्यायालयाने केला. न्यायालयाने या याचिकांवरील पुढील सुनावणी २९ ऑक्टोबर रोजी ठेवली आहे.
टीआरपी घोटाळ्याप्रकरणी आणखी एकाला अटक टीआरपी घोटाळ्याप्रकरणी शुक्रवारी पवईतून हरीश पाटील नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली. घोटाळ्यातील पाहिजे असलेल्या आरोपीला पळविण्यासाठी मदत केली म्हणून त्याच्यावर कारवाई करण्यात आली. टीआरपी घोटाळा प्रकरणातील ही नववी अटक आहे.