नितीन अग्रवाल ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कोरोना लसीबाबत विविध दावे केले जात असतानाच जगभरातही लोक आतुरतेने वाट पाहत आहेत; परंतु सफदरजंगच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या महावीर तीर्थंकर वैद्यकीय महाविद्यालयाच्या कम्युनिटी मेडिसिनचे विभागप्रमुख डॉ. जुगल किशोर यांचे म्हणणे आहे की, लसीपूर्वी समूह प्रतिकारशक्तीमुळे (हर्ड-इम्युनिटी) कोरोना नियंत्रित होईल. महाराष्ट्रासह देशाच्या इतर भागांत कोरोनापासून निपटण्यासाठी संवेदनशील भागांची ओळख पटवून आक्रमक तपासण्या करण्याची रणनीती आखावी लागेल.
देशातील प्रमुख तज्ज्ञांमध्ये अग्रणी असलेले डॉ. किशोर यांनी ‘लोकमत’ला विविधांगी मुलाखत दिली. दिल्लीत वेगाने संक्रमण फैलावले व लोकांत प्रतिकारशक्तीही विकसित झाली. जुलैच्या सुरुवातीस असे २३ टक्के लोक होते. हे प्रमाण आता ३० ते ३५ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. ४० ते ४५ टक्के लोकांत अँटिबॉडी विकसित झाल्यावर नव्या रुग्णांची संख्या आढळणे कमी होईल व ६० टक्के लोकांत अँटिबॉडी आढळल्यावर नवीन संक्रमणाचे प्रमाण न्यूनतम पातळीवर येईल.
आरोग्य मंत्रालयाने कोरोनावर तयार केलेल्या ६ तज्ज्ञ गटांमध्ये सहभाग असलेले डॉ. किशोर म्हणतात की, कोरोनातून बरे होणाऱ्या लोकांच्या शरीरात प्रतिसंरक्षणाचा विकास होतो. अशा लोकांची संख्या जास्त झाल्यास ते उर्वरित लोकांसाठी सुरक्षा कवचासारखे काम करतात.कोरोनामुक्तीच्या प्रश्नावर डॉ. किशोर म्हणतात की, खूप सावधगिरी बाळगल्याने केवळ संक्रमणाचा प्रसार नियंत्रित केला जाऊ शकतो. तो पूर्णपणे रोखला जाऊ शकत नाही. ज्या भागांत संक्रमितांची संख्या झपाट्याने वाढत आहे तेथेही ती उच्चांकी पातळीवर पोहोचल्यास वर्षाअखेर किंवा पुढील वर्षाच्या फेब्रुवारीपर्यंत नीचांकी पातळीवर येण्याची शक्यता आहे. कोरोना संपणारही नाही आणि आताच्या सारखा त्रस्तही करणार नाही.