मुंबईसह उपनगरांत मुसळधार पाऊस, रेल्वेसेवा विस्कळीत
By Admin | Updated: July 30, 2016 08:09 IST2016-07-30T08:03:53+5:302016-07-30T08:09:11+5:30
मुंबईसह पूर्व व पश्चिम उपनगरांना पावसाने चांगलेच झोडपून काढले असून रात्रभर पडलेल्या पावसामुळे काही भागात पाणी साचले असून रेल्वेसेवेवरही परिणाम झाला आहे.

मुंबईसह उपनगरांत मुसळधार पाऊस, रेल्वेसेवा विस्कळीत
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३० - मुंबईसह पूर्व व पश्चिम उपनगरांना पावसाने चांगलेच झोडपून काढले असून रात्रभर पडलेल्या पावसामुळे काही भागात पाणी साचले आहे. काल दिवसभर पावसाचा जोर कायम असतानाच रात्रीही उपनगरांत पावसाने दमदार हजेरी लावली. सतत पडणा-या पावसामुळे मध्य, पश्चिम व हार्बर अशा तिनही मार्गांवरील लोकलसेवेवरही परिणाम झाला असून गाड्या १५ ते २० मिनिटे उशीराने धावत आहेत.
शुक्रवारी दिवसभर पावसाचा जोर कायम होता, संध्याकाळी तो थोडा कमी झाला. मात्र त्यानंतर रात्रभर मुंबबईसह उपनगरांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. अंधेरी, वांद्रा, बोरिवली या पश्चिम उपनगरांसह घाटकोपर, कांजुरमार्ग, मुलुंड, ठाणे, डोंबिवली, कल्याण या पूर्व उपनगरांधमध्ये पावसाची संततधार कायम आहे. तसेच नवी मुंबईतही जोरदार पाऊस कोसळला असून ठिकठिकाणी पाणी साचले आहे. दरम्यान शहरात काल ( शुक्रवार) रात्री ८ ते (शनिवार) सकाळी ६ वाजेपर्यंत पावसाची ४४.७२ मिलीमीटर इतकी नोंद झाली आहे.
या जोरदारा पावसाचा फटका मुंबईची लाइफलाइन असलेल्या लोकलसेवेलाही बसला असून मध्य, पश्चिम व हार्बर लोकल उशीराने धावत आहेत. काही ठिकाणी रुळांवर पाणी साचल्यानेही लोकल सेवेत अडचण निर्माण झाली आहे. मात्र याचा फटका कामावर निघालेल्या चाकरमान्यांना बसला असून रेल्वे स्थानकांवर गर्दी पहायला मिळत आहे.
दरम्यान माटुंगा, लोअर परळ, घाटकोपर, अंधेरी यासारख्या भागात पावासाचे पाणी साचल्यामुळे रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. अंधेरी सबवेमध्ये आजही पाणी साचल्यामुळे हा मार्ग बंद ठेवण्यात आला आहे.