मुंबई : राज्यात विविध जिल्ह्यात मंगळवारी वादळी पावसाने दाणादाण उडविली. वीज पडून चार जणांचा मृत्यू झाला. अनेक ठिकाणी पशुधन दगावले. छतांवरील पत्रे, झाडे उन्मळून पडली. फळबागांचेही नुकसान झाले.
वीज पडून विटा बु. (ता. पाथरी, जि. परभणी) येथे धोंडीराम बापूराव हलबुरगे (४२) यांचा मृत्यू झाला. अहिल्यानगर जिल्ह्यात रामपूर (ता. राहुरी) येथे राहुल पठारे (३७), वर्धा जिल्ह्यातील तळोदी शिवारात बळीराम परचाके (६२), नाशिक जिल्ह्यात सोनगिरी (ता. सिन्नर) येथे रवींद्र प्रभाकर बोडके (३४) यांचा वीज पडून मृत्यू झाला आहे.
कोकण, प. महाराष्ट्राला तडाखासिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले. कोल्हापूर जिल्ह्यात अर्धा तास ढगफुटीसदृष्य पाऊस झाला. पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली. ३५ हून अधिक झाडांसह जाहिरातींचे फलक कोसळले. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात डाळिंबाचे नुकसान झाले. सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यातही पावसाचा जोर होता.
गारपीट, मुसळधार अहिल्यानगरच्या जामखेड तालुक्यात गारपिटीचा तडाखा बसला. नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस व वादळामुळे नुकसान झाले.
मराठवाड्यात तडाखापरभणीतील जिंतूरमध्ये पत्रे उडून दगडांचा मार बसल्याने दहा जण जखमी झाले. लातूरमध्येही वादळी पाऊस झाला. मराठवाड्यात १७ दिवसांत अवकाळी पावसामुळे २७ नागरिकांचा मृत्यू झाला, २१ जण जखमी झाले.
मान्सूनची आगेकूच; सहा दिवस आधीच धडकणारनवी दिल्ली : केरळमध्ये साधारणत: १ जूनला पोहोचणारा नैऋत्य मान्सून पुढील चार ते पाच दिवसांतच केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे, भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) मंगळवारी ही माहिती दिली.
बंगळुरूमध्ये तुफान पाऊस, ५ जणांचा मृत्यूबंगळुरूमध्ये मागील ३६ तासांपासून होत असलेल्या तुफान पावसामुळे मंगळवारीही जनजीवन प्रभावित झाले व अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. पावसाशी संबंधित घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला.
जोरदार पावसामुळे शहराच्या साई लेआऊटमध्ये एखाद्या द्वीपसारखी स्थिती झाली. येथील घरांचे जमिनीवरचे मजले अर्धेअधिक पाण्यात बुडाले आहेत. सोमवारी सुमारे १५० जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. आसामची राजधानी गुवाहाटीत सोमवारी रात्री तुफान पाऊस झाला व अनेक रस्ते, भाग जलमय झाले.