राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 05:20 IST2025-09-16T05:19:44+5:302025-09-16T05:20:51+5:30
रविवारी मध्यरात्रीपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली. अहिल्यानगर व बीड जिल्ह्यात चाैघे वाहून गेले.

राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
मुंबई/बीड : आंध्र प्रदेशवर निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र महाराष्ट्रावर सरकल्याने राज्याच्या बहुतांशी भागात सोमवारी मुसळधार पाऊस झाला. मराठवाड्यात बीडसह चार जिल्ह्यांत या पावसाने थैमान घातले. मंगळवारीही मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
रविवारी मध्यरात्रीपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली. अहिल्यानगर व बीड जिल्ह्यात चाैघे वाहून गेले.
मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
सलग पावसामुळे मुंबईच्या तापमानात घसरण झाली. कमाल तापमान २५.७ अंश नोंदविण्यात आले असून, सरासरीच्या तुलनेत ते ५.१ अंशांनी घसरले. गेल्या तीन वर्षांतील चालू महिन्यातील १५ सप्टेंबर हा सर्वाधिक थंड दिवस असून, ५६ वर्षांतील म्हणजे १९६९ पासूनचा तिसरा थंड दिवस आहे, अशी माहिती हवामान अभ्यासक अथ्रेय शेट्टी यांनी दिली.
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस; ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल
मराठवाड्यात १५ लाख हेक्टरवर पिकांचा चिखल, परळीत १५ गावांचा संपर्क तुटला, अहिल्यानगर जिल्ह्यात तीन जण वाहून गेले, ५० कुटुंबांचे स्थलांतर, सोलापूर जिल्ह्यात कमरेएवढे पाणी, रस्ते गेले पाण्याखाली, प्रमुख प्रकल्पांमधून विसर्ग वाढल्याने सतर्कतेचा इशारा, पुणे जिल्ह्यात २०० कुटुंबांना अतिवृष्टीचा फटका
छत्रपती संभाजीनगर/सोलापूर : मराठवाड्यात सलग दुसऱ्या दिवशी अतिवृष्टीचा जोर कायम होता. परिणामी, अनेक गावांसह शहरातील जनजीवन विस्कळीत झाले. रविवारीही रात्रीतून झालेल्या पावसामुळे ३२ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. दोन दिवसांतील पावसामुळे तीन लाख हेक्टरचे नुकसान झाले. त्यामुळे नुकसानीचा आकडा १५ लाख ५४३ हेक्टरपर्यंत गेला आहे.
हाती येणारी पिके गेली पाण्यात
संपूर्ण राज्यात अतिवृष्टीमुळे हाती येणाऱ्या पिकांना तडाखा बसला आहे. मराठवाडा व विदर्भात कापूस, सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वादळी वाऱ्यामुळे फळबागांना फटका बसला. कांदा, उडीद, हळद, मूग, तूर, मका, बाजरी, केळी व भाजीपाला या उभ्या व काढणीस आलेल्या पिकांचेही नुकसान झाले.
अहिल्यानगरमध्ये ढगफुटीसदृश
अहिल्यानगर, कर्जत, पाथर्डी, जामखेड या चार तालुक्यांत ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने नद्या-नल्यांना पूर आला. अनेक गावांचा संपर्क तुटला. घरांमध्ये पाणी शिरले आहे. ५० कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले. पुरामुळे पिके वाहून गेली आहेत. करंजीसह (ता. पाथर्डी) परिसरात पुराचे पाणी घुसल्याने ५० कुटुंबांच्या संसारोपयोगी वस्तू, ६ दुचाकी, तीन ट्रॅक्टर, एक चारचाकी, गुरे, शेळ्या या पुरात वाहून गेल्या. अनेक भागात फळबागा जमीनदोस्त झाल्या तर लोक घरातच अडकून पडले होते.
जिल्हा
मिमी
बीड ३७.१ धाराशिव २८.२ २४.८ लातूर २४.४
परभणी
(रविवारच्या पावसाची नोंद)
रविवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे बीड जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली. आष्टी तालुक्यातील शेरी खुर्द गावाच्या शेतशिवाराला तलावाचे स्वरूप आले.
पुरात ४ जण गेले वाहून
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात धामणगाव येथे एक तरुण पुरात वाहून गेला. घाटापिंपरीत घरात पुराचे पाणी शिरल्याने ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. अहिल्यानगर जिल्ह्यात तिघेजण वाहून गेले.
१५ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद. परळी तालुक्यात पुरामुळे १५ गावांचा संपर्क तुटला होता.
चार जिल्ह्यांना झोडपले
'लोकमत' प्रतिनिधींनी केली मदत : घाटा पिंपरी (बीड) येथे दोन कुटुंबे पुराच्या पाण्यात अडकली होती. 'लोकमत'चे प्रतिनिधी नितीन कांबळे व त्यांचे सहकारी प्रदीप साबळे यांनी जीव धोक्यात घालून त्यांना सुखरूप बाहेर काढले.
मुंबईसह, नवी मुंबईलाही जोरदार पावसाने झोडपून काढले. सखल भागात पाणी साचल्याने व्यावसायिकांना पाण्यातून मार्ग काढताना कसरत करावी लागली.
'आपत्कालीन स्थितीमध्ये प्रशासनाने सतर्क राहावे'
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी दुपारी मंत्रालयातील राज्य आपत्कालिन कार्य केंद्राला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
आष्टी, पाथर्डी (जि. बीड) तालुक्यात पुरात अडकलेल्या ४० ग्रामस्थांना एनडीआरएफच्या मदतीने एअरलिफ्ट करून सुरक्षित ठिकाणी हलवावे असे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.
अतिवृष्टी असलेल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी उपमुख्यमंत्र्यांनी संवाद साधला व सतर्कतेच्या सूचना दिल्या. २४ तासात सचेत अॅपद्वारे राज्यभरात पावसाचा अलर्ट देणारे ३५ कोटी मेसेज पाठविण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
नागपूर, सोलापूर जिल्ह्यात वादळी पावसाने झोडपले
१ नागपूर : नागपूर शहरात मेघगर्जना,
करंजी (ता. पाथर्डी) येथे घरांमध्ये पाणी शिरल्याने रहिवाशांचे नुकसान झाले आहे.
विजांच्या कडकडाटात सोमवारी दुपारी दीड तास धो-धो पावसाने थैमान घातले. त्यामुळे रस्त्यांना नदीचे स्वरुप आले होते. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यात तीन तासांपेक्षा अधिक वेळ झालेल्या मुसळधार पावसाने नदी-नाल्यांना पूर.
सोलापूर : जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी कमरेएवढे पाणी साचले. रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद झाली. अक्कलकोटलाही मुसळधारेने झोडपले. धाराशिव जिल्ह्यात ७मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. चारही धरणांतून पाण्याचा विसर्ग, सावरगाव (ता. तुळजापूर) येथे चार तास झालेल्या पावसामुळे सुमारे २०० हेक्टरवरील कांद्याची पिके वाहून गेली.
राशिन (ता. कर्जत) येथे झालेल्या मुसळधार पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
पुणे : हवेली, बारामती, इंदापूर तालुक्यामध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. काही ठिकाणी घरांमध्ये पाणी घुसल्यामुळे तब्बल २००च्या वर कुटुंबे बाधित झाली. पुणे-नगर आणि पुणे-सोलापूर महामार्गावर पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. सांगली शहर व परिसराला धुवाधार पावसाने झोडपून काढले. शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले होते.