वेगवान वाऱ्यासह कोसळलेल्या पावसानं ठाणे, रायगड, पालघरला झोडपलं; कोकण रेल्वेलाही फटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 08:31 IST2025-05-21T08:31:02+5:302025-05-21T08:31:22+5:30
जोरदार पावसाने कोकण रेल्वेलाही तडाखा दिला आहे. विशेषत: रत्नागिरीमध्ये पावसाचा जोर अधिक होता. मंगळवारी सायंकाळी कोकण रेल्वे मार्गावर वेरवली- विलवडे स्टेशनदरम्यान दरड कोसळली. यामुळे कोकण रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला.

वेगवान वाऱ्यासह कोसळलेल्या पावसानं ठाणे, रायगड, पालघरला झोडपलं; कोकण रेल्वेलाही फटका
मुंबई : वेगवान वाऱ्यासह कोसळलेल्या सरींनी बोरीवली, जोगेश्वरी, दहिसर, कांदिवली, विक्रोळीसह कुर्ला, घाटकोपर, वरळी, महालक्ष्मी, लोअर परळसह भायखळा आणि लगतच्या परिसराची तारांबळ उडवली.
पश्चिम उपनगरात दहिसरमधील सखल भागात किंचित पाणी साचले होते. अंधेरी सब वे वाहतुकीसाठी बंद होता. येथे रस्त्याच्या कडेलगत पाणी साचल्याने वाहतूक धीमी झाली होती. कांदिवलीच्या गांधीनगरमधील भाजीबाजारात पाणी शिरले होते. पूर्व उपनगरात लाल बहादूर शास्त्री मार्गावर वाहनांचा वेग कमी झाला होता. बेस्ट प्रवाशांचेही हाल झाले.
नवी मुंबईमध्ये तीन ठिकाणी वृक्ष काेसळले
ठाण्यात सायंकाळी चारनंतर पाऊस कोसळू लागला. मात्र, सहानंतर जोरधारा बरसू लागल्या. तुफानी पावसाने ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर आदी शहरे आणि त्या परिसरातील ग्रामीण भागाला झोडपून काढले.
नवी मुंबईमध्ये तीन ठिकाणी वृक्ष काेसळले. तेथील जनजीवन विस्कळीत झाले. शिवाय ठाणे-बेलापूरसह सायन-पनवेल महामार्गावर मोठी वाहतूककोंडी झाली. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरूड आदी तालुक्यांतही जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. अनेक ठिकाणची वीजही गायब झाली.
कोकण रेल्वेला फटका
जोरदार पावसाने कोकण रेल्वेलाही तडाखा दिला आहे. विशेषत: रत्नागिरीमध्ये पावसाचा जोर अधिक होता. मंगळवारी सायंकाळी कोकण रेल्वे मार्गावर वेरवली- विलवडे स्टेशनदरम्यान दरड कोसळली. यामुळे कोकण रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला. रेल्वे गाड्या ठिकठिकाणी थांबून होत्या. दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. जनशताब्दी, तेजस एक्स्प्रेसही अडकून पडल्या होत्या.
अंदाज... इशारा... आणि आवाहन
महाराष्ट्र आणि गोव्याजवळ अरबी समुद्रात २१ मेपासून कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. २४ मेपर्यंत तो अधिक तीव्र होऊन उत्तरेकडे सरकू शकतो. राज्याच्या किनाऱ्याला थेट धोका नसला तरी याचा परिणाम म्हणून समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता आहे. गुरुवार, २२ ते २४ मेदरम्यान रायगड, रत्नागिरी, मुंबई आणि पालघरजवळचा समुद्र खवळण्याचा अंदाज आहे. खोल समुद्रात जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.
पाऊस (मिमी)
बोरीवली ६३
जुहू ५८
दहिसर ५७
आरे ५६
कांदिवली ५०
मालवणी ४८
पवई ४७
विलेपार्ले ४४
सांताक्रूझ ४३
वर्सोवा ४१
मरोळ ४०
भांडूप ३६
दिंडोशी ३४
मुलुंड ३४
गोरेगाव ३२
मालाड २८
वांद्रे २५
विक्रोळी २२
बीकेसी २०
नवी मुंबई (मिमी)
बेलापूर २
नेरूळ १.५०
वाशी ६.६०
कोपरखैरणे १०.६७
ऐरोली ७.६२
दिघा २.६०