मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 05:24 IST2025-09-23T05:23:39+5:302025-09-23T05:24:26+5:30

मराठवाड्यातील अतिवृष्टीचा सोमवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी स्वतंत्र आढावा घेतला. जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून परिस्थिती जाणून घेतली.

Heavy rainfall in Marathwada, Jalgaon, Ahilyanagar, Solapur districts, Five people die, floods in Dharashiv, Beed, Chhatrapati Sambhajinagar | मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय

मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यासह जळगाव, अहिल्यानगर, सोलापूर या जिल्ह्यांत अतिवृष्टीने अक्षरश: हाहाकार माजवला. मराठवाड्यातील ७५ मंडळांत अतिवृष्टी झाली असून पावसाने ५ जणांचे जीव घेतले आहेत. बीड आणि धाराशिव  जिल्ह्यात पावसाने कहर केला.  

पुरात अडकलेल्या लोकांना हेलिकॉप्टर व बोटींच्या साह्याने स्थलांतरित केले जात आहे. पुढील संपूर्ण आठवडा पावसाचा असणार आहे. तसेच,  शुक्रवारनंतर पावसाचा जोर आणखी वाढेल, असा वेधशाळेचा अंदाज आहे.

दिवाळीपूर्वी भरपाई

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे जलदगतीने सुरू आहेत. दिवाळीपूर्वीच सर्व शेतकऱ्यांना भरपाई देण्यात येणार आहे, अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पुण्यात दिली, तर मराठवाड्यातील अतिवृष्टीचा सोमवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी स्वतंत्र आढावा घेतला. जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून परिस्थिती जाणून घेतली.

कुठे कुठे काय घडले?

हिंगोली : पांगरा (शिंदे) येथे ओढ्याला पूर आल्यामुळे ८० जण अडकले. त्यांना दोरीच्या साह्याने बाहेर काढण्यात आले.
जालना : दहा मंडळांत अतिवृष्टी, पुरात अडकलेल्या १४ जणांना वाचविले.
धाराशिव : परंडा तालुक्यात २० पेक्षा अधिक गावांत पुराचे पाणी, चिंचोली (ता. भूम) येथे ७० वर्षीय महिलेचा मृत्यू.
यवतमाळ : उत्तरवाढोणा (ता. नेर) वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू.
जळगाव : भोकरी (ता. पाचोरा) येथे पुरात वाहून गेल्याने युवकाचा मृत्यू.

जळगाव, अहिल्यानगर, सोलापूर जिल्ह्यातही धो धो

जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली. रुग्णालये, घरे, दुकानांमध्ये पाणी शिरले आहे.  सोलापूर जिल्ह्यात एकाच रात्री १९ मंडळांत अतिवृष्टी झाली.  चांदणी, भोगावती, नीलकंठा, नागझरी, राम, सीना नदीला पूर आला आहे. विदर्भात पावसाची विश्रांती असली तरी गेल्या काही दिवसांतील पावसामुळे पिकांची नासाडी झाली आहे. 

Web Title: Heavy rainfall in Marathwada, Jalgaon, Ahilyanagar, Solapur districts, Five people die, floods in Dharashiv, Beed, Chhatrapati Sambhajinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस