मुंबई : राज्यात उष्णतेचा कहर कायम असून मंगळवारी पारा आणखी चढल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. सर्वात जास्त झळ विदर्भाला बसली, तेथील सर्व प्रमुख शहरांमधील कमाल तापमान सरासरीपेक्षा ३ ते ५ अंशाने वाढले आहे़ मराठवाड्यात उष्माघाताने चार जणांचा बळी गेल्याचे उघड झाले.राज्यात सर्वाधिक कमाल तापमान चंद्रपूर येथे ४६़४ अंश सेल्सिअस एवढे नोंदले गेले. हे राज्यातील आजवरचे सर्वाधिक तापमान आहे़ सर्वात कमी तापमान पुणे येथे २०़४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. उपराजधान नागपुरातील पारा ४५.५ अंशावर पोहोचला आहे. या झपाट्याने चढत असलेल्या तापमानामुळे विदर्भाची लाही-लाही होत आहे. हरियाना, चंदीगड, दिल्ली, पंजाब, पश्चिम राजस्थान आणि तामिळनाडूच्या काही भागात उष्णतेची लाट कायम आहे़ पश्चिम उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, पूर्व राजस्थान आणि मध्य प्रदेश येथील कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे़ मराठवाड्यात उष्माघाताचे चार बळीमराठवाड्यात उष्माघाताने चौघांचा बळी घेतला. उस्मानाबाद, जालना, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात या घटना घडल्या. लोहारा (जि. उस्मानाबाद) शहरातील सुतारकाम करणाऱ्या मंगेश दत्ता गाडीलोहार (२३) याचा सोमवारी सांयकाळी उष्माघाताने मृत्यू झाला़ वसमत शहरातील (जि. हिंगोली)बालाजी नगर येथील सृष्टी खुडे (६) हिचा मंगळवारी उष्माघाताने मृत्यू झाला. तिला सोमवारी रात्रीपासून उलट्याचा त्रास सुरू झाला होता. मंगळवारी सकाळी ती बेशुद्ध झाली होती. नांदेडला उपचारासाठी नेत असतानाच तिची प्राणज्योत मालवली. जालना जिल्ह्यातील अकोलादेव (ता. जाफराबाद) येथील लक्ष्मीबाई हरिभाऊ गवई (६५) यांचा मृत्यू झाला. तर परभणी जिल्ह्यातील (ता. पाथरी) बाभळगाव पेठ येथील दिव्या आव्हाड या चार महिन्याच्या बालिकेचा उष्मघाताने मृत्यू झाला. बंडु आव्हाड हे तिला पत्नीसह शेतामध्ये घेऊन गेले होते़ रात्री ताप आल्याने तिची शुद्ध हरपली. खाजगी हॉस्पीटलमध्ये नेल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. प्रमुख शहरांमधील कमाल तापमान :पुणे ४०़८, अहमदनगर ४४़३, जळगाव ४४़२, कोल्हापूर ४०़, महाबळेश्वर ३५़३, मालेगाव ४४़६, नाशिक ४०़१, सांगली ४१़४, सातारा ४१़६, सोलापूर ४३़८, मुंबई ३३, अलिबाग ३३़६, रत्नागिरी ३२़५, पणजी ३३़७, डहाणु ३३़९, उस्मानाबाद ४३़१, औरंगाबाद ४१़४, परभणी ४४़२, नांदेड ४४़४, अकोला ४४़९, अमरावती ४३़६, बुलढाणा ४१, ब्रम्हपुरी ४५़८, चंद्रपूर ४६़४, गोंदिया ४४, नागपूर ४५़५, वाशिम ४३, वर्धा ४५, यवतमाळ ४४़ (अंश सेल्सिअस)
राज्यात उष्णतेचा कहर कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2017 02:38 IST