मुंबई: दिवसभर वैद्यकीय क्षेत्रातल्या तज्ज्ञांच्या बैठका, आरोग्य विभागातल्या अधिकाऱ्यांशी चर्चा, पत्रकार परिषदा अशा व्यस्त वेळापत्रकामुळे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची सध्या दमछाक होतेय. मात्र कोरोनाचं संकट परतवून लावण्यासाठी टोपे मेहनत घेत आहेत. विशेष म्हणजे या व्यस्त वेळापत्रकामुळे टोपे यांना आयसीयूमध्ये असलेल्या आईला भेटायलादेखील पुरेसा वेळ मिळत नाही. टोपेंच्या या कर्तव्यदक्षतेचं, त्यांच्याकडून सुरू असलेल्या अखंडपणे सुरू असलेल्या कामाचं सोशल मीडियावर कौतुक होतंय. राजेश टोपे यांच्या आईवर मुंबईतल्या बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र टोपे यांना आईला भेटायलादेखील वेळ मिळत नाही. रोजच्या कामातून अवघी काही मिनिटं त्यांना आईसाठी मिळतात. त्यांचा बाकीचा दिवस कोरोनाला रोखण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात, उपाययोजनांचा, राज्यातल्या परिस्थितीचा आढावा घेण्यात जातो. मात्र कौटुंबिक जबाबदारीपेक्षा टोपेंनी राज्याच्या जनतेच्या जबाबदारीला प्राधान्य दिलंय. काल राजेश टोपे पुण्यात होते. पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असल्यानं त्यांनी तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला. पुणे महापालिकेच्या आयुक्तांसोबत चर्चा करून त्यानंतर माध्यमांसोबत संवाद साधत परिस्थितीची माहिती दिली. यावेळी त्यांनी पुण्यातल्या त्यांच्या एका मित्राला आईच्या प्रकृतीबद्दल सांगितलं. ते सांगताना त्यांचे डोळे भरुन आले होते. आईला भेटायला मिळत नसल्याची खंत त्यांनी यावेळी बोलून दाखवली. शरद पवारांनी किल्लारीतल्या भूकंपावेळी केलेलं काम माझ्यासाठी आदर्श असल्याचं टोपेंनी सांगितलं. राजकीय गुरू शरद पवारांच्या संस्कारामुळे जबाबदारीला प्राधान्य देण्याचं माझं धोरण आहे. किल्लारी भूकंपावेळी पवार साहेबांना स्वत: पुढाकार घेऊन पुढे होऊन परिस्थितीचा सामना करताना पाहिलंय, तेच संस्कार माझ्या मनावर झालेत, असं टोपे म्हणाले. २० दिवसांपासून माझी आई विविध व्याधींमुळे बॉम्बे हॉस्पिटलच्या आयसीयूत मृत्यूशी झुंज देत आहे. मुलगा म्हणून मला तिची आवश्यक ती काळजी घेता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण लढाईत सेनापतीनं पुढाकार घेऊन इतरांना प्रोत्साहन देणं गरजेचं असतं, असं टोपेंनी म्हटलं.
Coronavirus: आई रुग्णालयात, मुलगा अहोरात्र कामात; कर्तव्यदक्ष राजेश टोपेंना सोशल मीडियाचा सलाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2020 14:47 IST
Coronavirus: कोरोनाला रोखण्यासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला; राजेश टोपे यांचे अथक प्रयत्न
Coronavirus: आई रुग्णालयात, मुलगा अहोरात्र कामात; कर्तव्यदक्ष राजेश टोपेंना सोशल मीडियाचा सलाम
ठळक मुद्देटोपेंच्या आईवर मुंबईतल्या बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरूकोरोनाशी संबंधित बैठकांमुळे टोपेंना आईसाठी पुरेसा वेळ देता येत नाहीकोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू; आरोग्यमंत्री अहोरात्र कामात