राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे. या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आपल्या हजारो समर्थकांसह थेट मुंबईत पोहचले आहेत. येथील आझाद मैदानावर कालपासून त्यांचे उपोषण सुरू आहे. दरम्यान, याच मुद्द्यावर राज्यातील राजकारणही तापलेले दिसत आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात शाब्दिक चकमकी सुरू झाल्या आहेत. यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट हल्ला चढवला आहे. "उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आपण म्हणत होतात, या सरकारची राजकीय इच्छाशक्ती नाही. राजकीय इच्छाशक्ती असेल तर आठ दिवसांत आरक्षण मिळू शकते. आता तुम्ही सत्तेवर आहात, आत तुमची राजकीय इच्छाशक्ती अरबी समुद्रात बुडाली का?" असा सवाल राऊतांनी केला आहे. ते आज मुंबईत पत्रकारांसोबत बोलत होते.
राऊत म्हणाले, "देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत, या आंदोलनाच्या चुलीवर कुणी पोळी भाजू नये. कोण भाजतंय? आतापर्यंत अशा प्रकारच्या आंदोलनांवर पोळ्या भाजण्याचे काम आपण केले आहे फडणवीस जी." याच वेळी "उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आपले वक्तव्य काय होते? जरा आठवा... आरक्षणासंदर्भात... आपण म्हणत होतात, या सरकारची राजकीय इच्छाशक्ती नाही. राजकीय इच्छाशक्ती असेल तर आठ दिवसांत आरक्षण मिळू शकते. आता तुम्ही सत्तेवर आहात, तुमची राजकीय इच्छाशक्ती अरबी समुद्रात बुडाली का? असा सवाल करत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधला आहे."
राऊत पुढे म्हणाले, "आपण राजकीय इच्छाशक्तीचे महामेरू आहात, असे मी मानतो. मग त्या राजकीय इच्छाशक्तीचे काय झाले? मराठा समाजाला आणि धनगर समाजाला सरकार आल्या बरोबर पहिल्याच कॅबिनेटमध्ये आठ दिवसांत आरक्षण देण्यासंदर्भात जी इच्छा शक्ती फडणवीस यांच्याकडे होती, ती कुठे गायब झाली. यासाठी त्यांनी एखाद्या एसआयटीची घोषणा करायला हरकत नाही."
"दोन समाजात आगी लाऊन, ते बघण्याचे काम विरोधी पक्ष करत आहेत, असे फडणवीस काल म्हणाले. विरोधी पक्षाला काय पडलेय आग लावायचे काम करून? सरकार कुणाचे आहे गेल्या काही काळापासून? आम्ही कशाला आगी लावू? दोन समाजात आगी लावून निवडणुकीत उतरण्याचे धंदे आपले आहे," असेही राऊत म्हणाले.