“हिंदी थोपवण्याच्या विरोधात, मराठीच्या अस्मितेसाठी काँग्रेसचा लढा सुरूच राहील”: सपकाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 16:55 IST2025-07-04T16:55:22+5:302025-07-04T16:55:46+5:30
Congress Harshwardhan Sapkal News: मराठी माणूस, मराठी संस्कृती, आणि महाराष्ट्राच्या आत्म्याचे रक्षण हेच आमचे आद्य कर्तव्य राहील, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले.

“हिंदी थोपवण्याच्या विरोधात, मराठीच्या अस्मितेसाठी काँग्रेसचा लढा सुरूच राहील”: सपकाळ
Congress Harshwardhan Sapkal News: वरळीच्या डोममध्ये ठाकरे बंधुंचा मराठी विजयी मेळावा होणार आहे. दोन्ही बंधुंनी या मेळाव्याकडे राजकीय लेबल न लावता मराठी भाषेचा विजय म्हणून पाहण्याचे आवाहन केले आहे. असे असले तरी तब्बल १८ वर्षांनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर भाषण करताना पाहायला मिळणार असल्याने या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. ठाकरे बंधूच्या एकत्र येण्याबाबत राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहेत. यातच काँग्रेसला या कार्यक्रमाचे निमंत्रण नाही, शरद पवारही या कार्यक्रमाला जाणार नाहीत, यावरून आता राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लढवले जात आहेत.
मराठी ही केवळ एक भाषा नाही; ती महाराष्ट्राच्या अस्मितेची, संस्कृतीची, इतिहासाची आणि लोकजीवनाच्या अभिव्यक्तीचा आत्मा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांपासून महात्मा फुलेंपर्यंत, लोकशाहीच्या चळवळींपासून सामाजिक परिवर्तनाच्या आंदोलनांपर्यंत, प्रत्येक टप्प्यावर मराठी भाषेनेच या भूमीच्या विचारांना आकार दिला आहे. मात्र, दुर्दैवाने आज महाराष्ट्रात मराठी भाषेवरच अन्याय सुरू आहे. शिक्षणाच्या माध्यमातून हिंदी जबरदस्तीने लादण्याचा प्रयत्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निर्देशावर चालणाऱ्या राज्य सरकारने सुरू केला आहे. मातृभाषेचा अवमान आणि मराठी भाषिक विद्यार्थ्यांवर होणारी भाषिक सक्ती ही केवळ अपमानास्पद नाही, तर ही सांस्कृतिक गुलामगिरीकडे घेऊन जाणारी हिंदी - हिंदू- हिंदू राष्ट्र या उद्देशाने सुरू आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
पुन्हा एकदा हिंदी लादण्याच्या संभाव्य कटाचे स्पष्ट संकेत
या विरोधात काँग्रेस पक्षाने सुरुवातीपासूनच ठाम आणि स्पष्ट भूमिका घेतली आहे. विविध सामाजिक-सांस्कृतिक संघटनांसह काँग्रेसने या लढ्यात सक्रिय सहभाग घेतला आहे. मराठीचा अभिमान, तिचे संवर्धन आणि तिच्या प्रतिष्ठेचा दर्जा अबाधित ठेवण्यासाठी काँग्रेसचा संघर्ष हा केवळ आंदोलनापुरता मर्यादित नाही, तर तो दीर्घकालीन, वैचारिक आणि लोकशाही मूल्यांचा लढा आहे. राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याचे दोन्ही शासन निर्णय मागे घेतले असले, तरी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेली नवीन समिती हे सरकारच्या पुन्हा एकदा हिंदी लादण्याच्या संभाव्य कटाचे स्पष्ट संकेत आहे, असा दावा सपकाळ यांनी केला आहे.
दरम्यान, शासन निर्णय मागे घेण्यात आले, हा लढ्यातील पहिला विजय आहे. मराठी भाषा संवर्धनासाठी झटणाऱ्या अभ्यासक, सामाजिक संघटना, आणि सर्व मराठीप्रेमी नागरिक यांचे मन:पूर्वक अभिनंदन. परंतु, ही लढाई अजून संपलेली नाही. मराठी ही आपली अभिव्यक्ती आहे, आमची संस्कृती आहे, आणि आमचा आत्मसन्मान आहे. या भूमीचा प्रत्येक कण, प्रेरणा देणारा आहे, प्रत्येक चळवळ ही मराठी भाषेतूनच घडलेली आहे. त्यामुळे मराठीवर होणाऱ्या कोणत्याही आक्रमणाविरोधात काँग्रेसचा लढा अखंड आणि अविरत राहील. भविष्यातही मराठी भाषेच्या सन्मानासाठी काँग्रेस पक्ष सदैव तत्पर राहील. मराठी माणूस, मराठी संस्कृती, आणि महाराष्ट्राच्या आत्म्याचे रक्षण हेच आमचे आद्य कर्तव्य राहील, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले.