अर्ध्या तासात पावसाने शहराला झोडपले; गारव्याने दिलासा चाकरमान्यांची त्रेधातिरपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 20:04 IST2021-06-01T20:02:51+5:302021-06-01T20:04:06+5:30
तीन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली जात असतानाच अखेर मंगळवारी संध्याकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.

अर्ध्या तासात पावसाने शहराला झोडपले; गारव्याने दिलासा चाकरमान्यांची त्रेधातिरपीट
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली: तीन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली जात असतानाच अखेर मंगळवारी संध्याकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. अवघ्या अर्धा तासात पावसाने शहराला झोडपून काढले. ऐनवेळी आलेल्या पावसामुळे चाकरमान्यांसह पादचाऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली होती. राज्य शासनाच्या कडक निर्बंध संदर्भातील बदलांमुळे शहरातील दुकाने दुपारी दोन वाजल्यानंतर बंद करण्यात आली होती, त्यामुळे शहरातील प्रमुख हमरस्त्यांवर संध्याकाळी पावसाचा अंदाज घेत तुलनेने शुकशुकाट पसरला होता.
कामावर गेलेले चाकरमानी घरी परतत असताना त्यांचे मात्र हाल झाले. पावसाचा जोर खूप असल्याने नागरिकांनी रिक्षेचा पर्याय स्वीकारला होता, मात्र काही वेळाने रिक्षादेखील उपलब्ध न झाल्याने नागरिकांनी आडोसा शोधत एका ठिकाणी थांबणे पसंत केले. रस्त्यांवर किरकोळ चीजवस्तू विक्रेत्यांची देखील गौरसोय झाली होती. पूर्वेकडील, पश्चिमेकडे रेल्वे स्थानक परिसरात अनेकांनी फलाटात प्रतीक्षा करणे पसंत केले. अर्धा तासांहून अधिक वेळ पावसाचा जोर।कमी झाला नव्हता. पावसामुळे काही वेळात वातावरणात गारवा निर्माण झाल्याने प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला.
वीज पुरवठा खंडित
महावितरणच्या मुख्य विजवाहिनीत तांत्रिक बिघाड झाल्याने शहरातील काही भागात दुपारी १२.४० वाजण्याच्या सुमारास वीज पुरवठा खंडित झाला होता. काही भागात वीज प्रवाह डिम देखील झाला होता. संध्याकाळच्या पावसात मात्र शहरातील वीज पुरवठा सुरळीत असल्याचे निदर्शनास आले.