“जरांगे म्हणतील तसे करणे चुकीचे, मराठा आरक्षणाचा कायदा मंजूर होताच...”; सदावर्तेंचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2024 19:32 IST2024-02-19T19:32:06+5:302024-02-19T19:32:13+5:30
Gunaratna Sadavarte News: सगेसोयरे कायदा करता येणार नाही, असे मत गुणरत्न सदावर्ते यांनी व्यक्त केले आहे.

“जरांगे म्हणतील तसे करणे चुकीचे, मराठा आरक्षणाचा कायदा मंजूर होताच...”; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte News: मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण सुरू आहे. मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकार एक दिवसाचे विशेष अधिवेशन घेत आहे. यावरून आता राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. यातच वकील गुणरत्न सदावर्ते यांनी थेट शब्दांत इशारा दिला आहे.
कोणीतरी जरांगे उपोषणाचे ढोंग करत आहे. ट्रॅक्टर असूनही ट्रॅक्टर नसल्याचे सांगितले जात आहे. घर असूनही ते नसल्याचे सांगितले जात आहे. अंगठे बहाद्दर माणसांकडून सर्वेक्षण केले. मनोज जरांगे यांचा मोर्चाचा स्टंट होता. मनोज जरांगे यांनी मराठा बांधवांना बुमरँग केले. मनोज जरांगेंच्या हिशोबाने कायदा करणे चुकीचे आहे. कारण जरांगे म्हणजे कायदा नाही, अशी टीका गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. आरक्षणाच्या गलिच्छ राजकारणाचा हा दिवस असेल. मराठा समाजाला मागास ठरवण्याचा घाट घातला जात आहे. कायदा तयार करण्याची संहिता आपण विसरलोत का? अशी विचारणा सदावर्ते यांनी केली.
सगेसोयरे कायदा करता येणार नाही
५० टक्के खुल्या प्रवर्गासाठी ठेवलेल्या जागेतून आरक्षण देता, इतरांना फक्त ३७ टक्के जागा उरणार. ओबीसींच्या बाबतीत कुणबीकरण केले जाऊ शकत नाही. सगेसोयरे कायदा करता येणार नाही. सरकारने कायदा केला तर परिणाम भोगायला तयार राहावे. विशेष अधिवेशनात सरकारने कायदा आणला तर काही तासांत न्यायालयात कायद्याला चॅलेंज करणार, असा इशारा गुणरत्न सदावर्ते यांनी दिला.
दरम्यान, राज्य सरकारला विनंती आहे की, विशेष अधिवेशनात पहिल्या सत्रात सगेसोयरे विषय मांडून त्याची अंमलबजावणी करावी. मराठा समाजाच्या वतीने विनंती आहे. ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत, त्यांना लाभ मिळावा म्हणून या अधिसूचनेची अंमलबजावणी करावी. अधिवेशनाच्या सुरुवातीलाच हा विषय घ्यावा ही विनंती. सगळे आमदार आणि सगळे मंत्री यांनी हा विषय लावून धरावा. अंमलबजावणी झाल्यावर तो वेगळ्या प्रवर्गाच्या विषय घ्यावा. सरकार काळजीवाहू आहे. जनतेचे मायबाप आहे, असे मनोज जरांगे यांनी म्हटले.