गुलाबराव पाटलांच्या ड्रायव्हरने हॉर्न वाजविल्याने वाद पेटला; जळगावमधील पाळधीत मोठा राडा, संचारबंदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 11:21 IST2025-01-01T11:20:54+5:302025-01-01T11:21:59+5:30
Gulabrao Patil Clash News: पाळधी गावात कर्फ्यू लागू करण्यात आला असून आता परिस्थिती नियंत्रणात आहे.

गुलाबराव पाटलांच्या ड्रायव्हरने हॉर्न वाजविल्याने वाद पेटला; जळगावमधील पाळधीत मोठा राडा, संचारबंदी
सरत्या वर्षाला निरोप देण्याच्या रात्री जळगावात मोठा राडा झाला आहे. शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांच्या जिल्ह्यात त्यांच्या ड्रायव्हरने हॉर्न वाजविल्याच्या व कारला कट मारल्याच्या रागातून वाद झाला आहे. यातून जमावाने वाहने आणि दुकाने जाळल्याचा प्रकार घडला आहे.
पाळधी गावात कर्फ्यू लागू करण्यात आला असून आता परिस्थिती नियंत्रणात आहे. मंत्री गुलाबराव पाटलांच्या कुटुंबाला घेऊन त्यांचा ड्रायव्हर जात होता. यावेळी त्याने हॉर्न वाजविला आणि कारला कट मारल्याच्या रागातून वाद सुरु झाला. यामुळे पाळधी गावातील काही तरुण जमा झाले. याची खबर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना लागताच ते देखील तिथे दाखल झाले. यातून गोंधळ सुरु झाला व दगडफेक आणि जाळपोळीची घटना घडली. या घटनेत १२-१५ दुकाने जाळण्यात आली आहेत.
पाळधी गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. २०-२५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन केले आहे. गुरुवारी सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे, असे कविता नेरकर, अप्पर पोलीस अधीक्षक यांनी म्हटले आहे. अंतर्गत वादातून दोन गटात वाद झाला असल्याचं पोलिसांनी म्हटले आहे.