Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 08:32 IST2025-09-22T08:31:22+5:302025-09-22T08:32:35+5:30
Eknath Shinde On GST: देशात आजपासून नवे जीएसटी दर लागू झाले असून आता फक्त पाच टक्के आणि १८ टक्के असे दोनच जीएसटी स्लॅब राहतील.

Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
देशात आजपासून नवे जीएसटी दर लागू झाले असून आता फक्त पाच टक्के आणि १८ टक्के असे दोनच जीएसटी स्लॅब राहतील. त्यामुळे स्वयंपाकघरातील वस्तूंपासून इलेक्ट्रॉनिक्सपर्यंत, औषधे, उपकरणांपासून ऑटोमोबाइलपर्यंतच्या क्षेत्रात समाविष्ट ३७५ वस्तूंचे दर कमी झाले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जीएसटीमध्ये करण्यात आलेल्या सुधारणांचे स्वागत करत, त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'मास्टरस्ट्रोक' आणि 'दिवाळी भेट' असे म्हटले आहे.
जीएसटी परिषदेने २२ सप्टेंबरपासून १२ टक्के आणि २८ टक्के जीएसटी स्लॅब रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स, औषधे आणि ऑटोमोबाईलसह एकूण ३७५ वस्तूंवरील जीएसटीचे दर कमी होणार आहेत. शिंदे यांनी सांगितले की, या निर्णयामुळे सामान्य नागरिक, मध्यमवर्गीय आणि लहान दुकानदारांना मोठा फायदा होईल. तसेच, यातून बांधकाम क्षेत्र, उत्पादन आणि रोजगार वाढेल. या निर्णयामुळे 'लाडक्या बहिणी' अजून जास्त आनंदी होतील, असेही शिंदे म्हणाले. त्यांनी हा निर्णय देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना देईल असा विश्वास व्यक्त केला.
जीएसटी परिषदेने जीएसटी स्लॅब १२ टक्के आणि २८ टक्क्यांवरून कमी करून आता ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच स्लॅब ठेवण्यात आले आहेत. सिगारेट, तंबाखू आणि दारू यांसारख्या वस्तूंवर ४० टक्के जीएसटी लागू केला जाईल.
एकनाथ शिंदेंचे 'एक्स' अकाउंट हॅक
एकनाथ शिंदे यांचे एक्स अकाऊंट रविवारी सकाळी हॅक झाले. हॅकर्सनी त्यांच्या अकाऊंटवर पाकिस्तान व तुर्कियेचे झेंडे असलेली पोस्ट शेअर केली. एक व्हिडीओही पोस्ट केला होता. मात्र, काही मिनिटांतच या पोस्ट डिलीट करून अकाऊंट सुरक्षित करण्यात आले. पाकिस्तानशी संबंधित पोस्ट थेट उपमुख्यमंत्र्यांच्या अकाऊंटवर शेअर झाल्यामुळे हा सायबर हल्ला असल्याचे मानले जात आहे. विरोधकांनी याप्रकरणी सामान्यांच्या ऑनलाईन सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले.