सांगली जिल्ह्यात १३०० कोटींचा जीएसटी; देश, राज्याच्या तुलनेत अधिक वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 16:36 IST2025-03-05T16:34:47+5:302025-03-05T16:36:54+5:30
कारवाई मोहीम सुरूच

सांगली जिल्ह्यात १३०० कोटींचा जीएसटी; देश, राज्याच्या तुलनेत अधिक वाढ
सांगली : जिल्ह्यात उद्योग, व्यवसायातील वाढीचा आलेख आता जीएसटी महसुलातून स्पष्टपणे दिसत आहे. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या ११ महिन्यांत १ हजार ३०० कोटींचा जीएसटी जमा झाला असून मागील वर्षाच्या तुलनेत यंदा १५ टक्के वाढ नोंदली गेली आहे.
मागील आर्थिक वर्षात एप्रिल २०२३ ते फेब्रुवारी २०२४ मध्ये १ हजार १३५ कोटी जीएसटी जमा झाला होता. यंदाच्या आर्थिक वर्षात त्याच कालावधीत १ हजार ३०० कोटी इतका जीएसटी जमा झाला आहे. म्हणजेच यंदा १६५ कोटींची भर पडत १५ टक्के वाढ नोंदली गेली आहे.
देशात सध्या १ कोटी ४९ लाख ३४ हजार ३७९ करदाते आहेत. मागील आर्थिक वर्षात एप्रिल २०२३ ते फेब्रुवारी २०२४ मध्ये देशाचे जीएसटीचे कलेक्शन १८ लाख ३९ हजार ७६६ कोटी होते. एप्रिल २०२४ ते फेब्रुवारी २०२५ चा महसूल २० लाख १२ हजार ७२० कोटी इतका झाला. या ११ महिन्यांत देशाच्या जीएसटी महसुलात ९.४ टक्के वाढ दिसते.
महाराष्ट्राचा विचार करता राज्यात सध्या १७ लाख ९५ हजार १९३ करदाते आहेत. मागील आर्थिक वर्षात एप्रिल २०२३ ते फेब्रुवारी २०२४ मध्ये जीएसटीचा एकूण महसूल २ लाख ९५ हजार ४५७ कोटी होता. चालू आर्थिक वर्षात त्याच काळात ३ लाख २८ हजार ३२१ कोटी जीएसटी जमा झाला. ही वाढ ११.१२ टक्के नोंदली गेली.
कारवाई मोहीम सुरूच
करचोरीविरोधी विशेषतः बनावट देयके देणाऱ्यांवर नियमित कारवाई, बनावट नोंदणीधारकांची शोधमोहीम या गोष्टी जीएसटी संकलन वाढीत योगदान देत आहेत.
देश, राज्याच्या तुलनेत जिल्ह्यात अधिक वाढ
जिल्ह्यात ३१ हजार ८९५ करदाते आहेत. जिल्ह्यात महसूल वाढ ११ महिन्यांतील महसूल वाढ १५ टक्के असून ही देशाच्या तसेच राज्याच्या वाढीच्या तुलनेत सातत्याने चांगलीच दिसत आहे. तसेच केंद्र व राज्य जीएसटी विभागाने लेखापरीक्षण तसेच कर चुकवेगिरी विरोधी कारवाया, कर निर्धारण, विवरण पत्रे छाननी तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांचा वापर विभागाने वाढवल्याने त्याचाही सकारात्मक परिणाम या वाढीवर दिसून येत आहे.