दि ग्रेट इंडियन काँग्रेस सर्कस

By Admin | Updated: October 8, 2014 23:01 IST2014-10-08T22:01:21+5:302014-10-08T23:01:21+5:30

सरकारनामा

The Great Indian Congress Circus | दि ग्रेट इंडियन काँग्रेस सर्कस

दि ग्रेट इंडियन काँग्रेस सर्कस

सांगलीत काँग्रेस कमिटीजवळच्या सर्कशीच्या तंबूला झळाळी आली होती. बारामतीकर आणि बडोद्याच्या (म्हणजे नरेंद्रभार्इंच्या हो!) सर्कशीपेक्षा यंदाचा हंगाम आपणच मारून न्यायचा, यासाठी तंबूचं कापड बदललं होतं. कसरतीसाठी काही नव्या चेहऱ्यांना आणलं होतं. रिंगमास्टर आणि प्रशिक्षक होते खुद्द कदमसाहेब. त्यांनी चाबूक घेऊनच नेहमीच्या स्टाईलनं कसरती करून घ्यायला सुरूवात केली.
बोरगावचा जितेंदर आणि केरेवाडीच्या शेंडग्यांचा सुरेश यांना वाघ-सिंहाच्या पिंजऱ्यात जायची आॅर्डर साहेबांनी सोडली. दोघं कचरायला लागले. पाय मागं ओढायला लागले. साहेब म्हणाले, ‘लेकांनो, घाबरताय काय? इस्लामपूरचा वाघ अन् तासगावचा सिंह माझ्या इशाऱ्याबाहेर नाहीत. जरा बोचकारतील... पण काळजी करू नका. जितेंदर, तू मात्र लक्षात ठेव. त्या प्रतीकचं ऐकून जाशील वाघाच्या अंगावर अन् जिवाला मुकशील. गंमतीजमती करू नकोस, परत सर्कशीत उभं राहता येणार नाही, अशी अवस्था करून ठेवंल त्यो वाघ!’ साहेबांनी त्यांना पिंजऱ्यात ढकललं. दोघांनी हळूहळू वाघ-सिंहाच्या अंगावर ‘हात’ फिरवायला सुरुवात केली... जितेंदरनं तर वाघाच्या तोंडात हात घातला. साहेबांनी वाघाला आतमध्ये गुपचूप बक्कळ खाद्य पुरवलं होतं. त्यामुळं वाघ खूश होता. जितेंदरच्या पाठीवर तोही मायेनं पंजा फिरवू लागला. दोघं खेळू लागले...
मुंबईकर असल्यानं शेंडगेंच्या सुरेशला या खेळाचा अनुभव नव्हता. तो वचकून लांब-लांब जायला लागला. साहेब ओरडलेच... ‘अरे, तुम्ही सगळे भाऊ सर्कशीत ‘एक्स्पर्ट’ ना! चौघंपण वेगवेगळ्या सर्कशी बदलायची कसरत कशी करता रे? तसंच इथंपण खेळायचं. जरा आयाळ ओढ त्येची. काऽऽही करणार नाही. त्येला संजयकाका अन् घोरपडे सरकारनं पिंजऱ्यातच जखडून टाकलंय. ‘ऐसी बडी-बडी सर्कसमें छोटे-छोटे हादसे होते रहते हैं’ असं मनातल्या-मनात म्हणून त्यो गप्प बसंल...’
साहेबांनी जतमधल्या पाहुण्यांकडील सावंतांच्या पोराला बोलावलं. त्याला झोपाळ्याच्या कसरती शिकवायला लागले. ‘कसं हो साहेब, भीती वाटतीया...’ असं तो म्हणताच, ‘अरे, झोकं घेत-घेत इकडच्या झोक्यावरनं तिकडच्या झोक्याकडं झोकून द्यायचं. विश्वजित हाय तुला झेलायला. त्या शिंदे-जमदाड्यांनी हात सोडलाय... पण पडलास तर बिलकूल काळजी करू नको. खाली जाळी लावलीया. पहिल्या-पहिल्यांदा असं होतंच. ’ तेवढ्यात शिराळ्याचा सत्यजित आला. ‘तू त्या कराडच्या बाबाचा कसरतपटू. कावळा बसायला अन् फांदी तुटायला... आघाडी फुटायला अन् तिकीट मिळायला... असं झालंय बघ तुझं! तू मौत का कुआमध्ये जा. डोळं मिटून हाय त्या स्पीडनं गाडी पळवायची. त्या दोघा नाईकांमधनं कसं सटकायचं ते बघ!’
मिरजेतल्या जाधवांच्या सिद्धार्थला त्यांनी तारेवरंनं चालायला सांगितलं. हातात सांगलीकरांचा बांबू दिला, तोल सावरायला! ‘पूर्वभागाकडं बघत चाल, पडायचे चान्सेस कमी होतील...’ असं बजावलं. विट्याच्या सदाभाऊंना हातातील चार-चार डंबेल्स वर उडवून झेलायच्या कसरती करायला सांगितल्या. हातचलाखी आणि अशा कसरतीत सदाभाऊंचा हात कोणी धरणार नाही, हे साहेबांना माहीत होतं. तरीही त्यांनी सांगितलं, ‘सदाभाऊ जपून. एकाचवेळी चार-चार डंबेल्सनं खेळताय. आटपाडीचं बारीक लक्ष हाय तुमच्याकडं. संजयकाकाकडं बघू नका. डंबेल्सवरनं जरा नजर इकडं-तिकडं झाली, की खेळ खल्लास!
जाता-जाता : एवढा वेळ साहेबांची शिकवणी लांब बसून बघणारे मदनभाऊ पुढं आले. साहेबांनी सांगितलं, ‘घे बंदूक, नेम धर. कमळ अन् घड्याळ दोन्ही एकाच गोळीत फुटलं पाह्यजे बघ. धनुष्यबाणाच्या आधी आपल्या हातातनं गोळी सुटली पाह्यजे! तसा तू नेमबाज हायस, पण डोळा इकडं-तिकडं हलवू नको.’ भाऊ लगेच म्हणाले, ‘होय साहेब, मागच्यावेळी इस्लामपूरवाल्यांनी तंबू पेटवल्यानं दंगा उसळला अन् नेम चुकला. आता बघाच!’ मदनभाऊंनी प्रॅक्टिस सुरू करताच साहेबांनी रिंगमास्टरचा ड्रेस काढला. कसरतीचे कपडे चढवले आणि झोपाळ्यावर जाण्यासाठी वळले... त्यांना स्वत:लाही कसरती करायच्या होत्याच की!

- श्रीनिवास नागे

Web Title: The Great Indian Congress Circus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.