कौतुकास्पद! देशातील पहिले डिजिटल शिक्षणाचे ऑनलाईन पोर्टल ‘महाज्ञानदीप’ महाराष्ट्रात सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 16:29 IST2025-04-16T16:28:47+5:302025-04-16T16:29:04+5:30
India's first digital education online portal Mahagyandeep: या उपक्रमात ५ वेगवेगळ्या विद्यापीठांचा समावेश करण्यात आला आहे

कौतुकास्पद! देशातील पहिले डिजिटल शिक्षणाचे ऑनलाईन पोर्टल ‘महाज्ञानदीप’ महाराष्ट्रात सुरू
India's first digital education online portal Mahagyandeep: डिजिटल शिक्षणाच्या दिशेने महाराष्ट्राची वाटचाल सुरू झाली असून महाज्ञानदीप’या ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून शैक्षणिक सुविधांचे लोकाभिमुखीकरण करण्यासाठी देशातील पहिले डिजिटल शिक्षण पोर्टल महाराष्ट्रात सुरू झाले आहे.असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.
आज मंत्रालयात ‘महाज्ञानदीप’ पोर्टलचा शुभारंभ उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेश देवळाणकर, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सजीव सोनवणे, आयआयटी गांधीनगरचे प्रा. समीर सहस्त्रबुद्धे तसेच राज्यातील विविध विद्यापीठांचे कुलगुरू, कुलसचिव, प्राध्यापक, विविध विद्याशाखांचे संचालक, पत्रकार आणि अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते.
जगभरातील मराठी भाषिक व अभ्यासक यांना उपलब्ध असेल, अशा प्रकारचे डिजीटल शिक्षणाचे पोर्टल शासनाच्या अधिपत्याखाली देशात प्रथमच महाराष्ट्राच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने ‘महाज्ञानदीप पोर्टल’ म्हणून निर्माण केले आहे.
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) April 16, 2025
आज मंत्रालय, मुंबई येथे माझ्या हस्ते या पोर्टलचे उद्घाटन करण्यात… pic.twitter.com/8pLBjOjW02
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले,‘महाज्ञानदीप’ उपक्रमांतर्गत एक हजार MOOC तज्ज्ञ प्राध्यापक घडवण्याचा संकल्प आहे. आतापर्यंत १५० प्राध्यापकांना प्रशिक्षण देण्यात आले असून, त्यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP-2020) अंतर्गत 'भारतीय ज्ञान प्रणाली – जेनेरिक' (IKS - Indian Knowledge System - Generic) हा अभ्यासक्रम मराठी भाषेत तयार केला आहे. हा अभ्यासक्रम या पोर्टलवर अपलोड करण्यात आला असून जगभरातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. या पोर्टलच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही गुणवत्तापूर्ण शिक्षण ऑनलाईन सहज एका क्लिकवर उपलब्ध होईल.
या उपक्रमामध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ मुंबई यांचा समावेश आहे.