सौम्यचे झाले 'सोम्य', वाढवणचे 'वाधावण'; मुंबई पोलिस भरतीच्या प्रश्नपत्रिकेत 'शुद्धलेखना'च्या चुका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 06:37 IST2025-01-14T06:36:16+5:302025-01-14T06:37:05+5:30
मुंबईतील २,५७२ पोलिस शिपाई पदाची व ९१७ पोलिस चालक पदांची त्याचबरोबर बँड पोलिस व कारागृह पोलिस पदांची सुद्धा लेखी परीक्षा तब्बल ५ महिन्यांनंतर पार पडली.

सौम्यचे झाले 'सोम्य', वाढवणचे 'वाधावण'; मुंबई पोलिस भरतीच्या प्रश्नपत्रिकेत 'शुद्धलेखना'च्या चुका
- प्रशांत ननावरे
बारामती : मुंबई पोलिस दलातील भरतीसाठी गेल्या रविवारी लेखी परीक्षा पार पडली. या प्रश्नपत्रिकेमध्ये मराठी शुद्धलेखनाच्या अनेक चुका आढळून आल्या आहेत. यावर आता विद्यार्थ्यांमध्ये खमंग चर्चा रंगली आहे.
मुंबईतील २,५७२ पोलिस शिपाई पदाची व ९१७ पोलिस चालक पदांची त्याचबरोबर बँड पोलिस व कारागृह पोलिस पदांची सुद्धा लेखी परीक्षा तब्बल ५ महिन्यांनंतर पार पडली. या लेखी परीक्षेमध्ये पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराचा उल्लेख 'वाधावण' बंदर असा करण्यात आला आहे. सौम्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विचारताना सौम्यचे 'सोम्य' असे करण्यात आले आहे. उंदीर या शब्दाचे सामान्य रूप विचारून पर्यायामध्ये 'डंदरा' असे करण्यात आले आहे.
त्याचबरोबर सामान्य रूप न होणारा शब्द ओळखा असा प्रश्न विचारून पयार्यामध्ये 'थ्संह' असा विचित्र शब्द तयार करण्यात आलेला आहे. ऑक्सिजन बर्ड पार्कचे उद्घाटन कोठे झाले, असा प्रश्न विचारून पर्यायामध्ये नागपूर ऐवजी 'नगपूर' असे करण्यात आले.