महाराष्ट्र अस्थिर व्हावा ही सरकारची इच्छा; संजय राऊतांनी शिंदे-फडणवीसांना फटकारलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2023 11:40 IST2023-03-30T11:39:37+5:302023-03-30T11:40:58+5:30
सर्वोच्च न्यायालयाने एकच हातोडा मारला त्याबद्दल आभारी आहोत असं संजय राऊत म्हणाले.

महाराष्ट्र अस्थिर व्हावा ही सरकारची इच्छा; संजय राऊतांनी शिंदे-फडणवीसांना फटकारलं
मुंबई - महाराष्ट्र राज्यात अशांतता निर्माण व्हावी असा एकमेव हेतू राज्य सरकारचा आहे. गृहमंत्री आणि गृहमंत्रालय अस्तित्वात आहे की नाही? फडणवीस दिसत नाही. निराश आणि वैफल्यग्रस्त अवस्थेत देवेंद्र फडणवीस काम करतायेत. ती कारणे शोधावी लागतील. ते जाहीरपणे सांगणार नाही. संभाजीनगरला जी परिस्थिती निर्माण झाली ते सरकारचे अपयश आहे असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारवर लावला आहे.
ठाकरे गटाचे खा. संजय राऊत म्हणाले की, राज्यात सरकार अस्तित्वातच नाही. विशेषत: मुख्यमंत्री स्वत:ला गुलाम असल्याची जाणीव करून देतायेत. बसू का, वाचू का, डोळे उघडू का, खाऊ का यालाच सर्वोच्च न्यायालयाने वेगळ्या शब्दात ताशेरे ओढले आहेत. महाराष्ट्रात दंगली व्हाव्यात, धार्मिक-जातीय तणाव वाढावेत. अस्थिरता राहावी असं काम सरकार करतेय. राज्यात अनेक ठिकाणी ही परिस्थिती निर्माण व्हावी ही सरकारची इच्छा आहे. त्यासाठी शिंदे गटाच्या अनेक टोळ्या काम करतायेत. सर्वोच्च न्यायालयाने एकच हातोडा मारला त्याबद्दल आभारी आहोत. जनतेचे डोके ठिकाणावर आहे. आता तरी सरकारचे डोके ठिकाणावर यावे असं त्यांनी म्हटलं.
तसेच महाराष्ट्र सरकारला नपुंसक म्हटलं, गेले काही महिने राज्यातील जनता हेच म्हणते. यामागे तरी आम्ही नाही. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरकारविषयी हे निरिक्षण आहे त्यावरून या सरकारची प्रतिष्ठा, पत काय आहे आणि हे सरकार कशापद्धतीने आले अन् काम करतेय हे एका वाक्यातून स्पष्ट झाले. आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयाने कुठल्याही राज्य सरकारविरोधात नपुंसक हा शब्द वापरला नव्हता असं संजय राऊतांनी म्हटलं.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या दोन गटातील वादामुळे २ एप्रिलला होणारी मविआची सभा होणार का असा प्रश्न संजय राऊतांना विचारला असता त्यावर महाविकास आघाडीची सभा दणक्यात होतील. शिवसेनेची सभाही होईल. खेड, मालेगाव सभेनंतर आता ठाकरेंची पुढील सभा पाचोऱ्यात, विदर्भात होईल. त्याची तयारी सुरू आहे अशी माहिती राऊतांनी दिली.