मुंबई - विधिमंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच विधान भवनाच्या पायऱ्यांवर २ आमदारांच्या समर्थकांमध्ये मारामारीचा प्रकार घडल्याचं या पावसाळी अधिवेशनात दिसून आले. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यातील हा वाद हाणामारीपर्यंत टोकाला पोहचला होता. या मारामारीत पडळकरांच्या २ कार्यकर्त्यांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले होते. या प्रकरणी कोर्टाने जामीन दिल्यानंतर नवी मुंबईतील कळंबोली येथे आरोपी ऋषी टकले याचे जंगी स्वागत करण्यात आले.
मारहाण प्रकरणी पोलिसांनी आव्हाड आणि पडळकर यांच्या कार्यकर्त्यांना अटक केली. त्यानंतर त्यांना कोर्टासमोर हजर करण्यात आले होते. कोर्टाने २५ हजारांच्या जातमुचलक्यावर दोन्ही कार्यकर्त्यांना जामीन दिला. मात्र या जामीनानंतर ऋषी टकले याचे नवी मुंबईत पडळकर समर्थकांनी जोरदार स्वागत केले. गळ्यात फुलांचा हार, डोक्यावर फेटा आणि ढोल ताशांच्या गजरात ही मिरवणूक काढण्यात आली. कळंबोलीतील हनुमान मंदिर आणि मायक्का मंदिरात जाऊन ऋषी टकले याने दर्शन घेतले. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधान भवनाच्या पायऱ्यांवर पडळकर आणि आव्हाड समर्थक एकमेकांना भिडले. त्यात आमदार गोपीचंद पडळकर यांचे समर्थक ऋषी टकले आणि इतरांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांचा समर्थक नितीन देशमुख यांना मारहाण केली. अधिवेशन सुरू असताना विधान भवनाच्या पायऱ्यांवर झालेल्या या हाणामारीमुळे विधान भवनाच्या परंपरेला मोठा धक्का बसला. या घटनेचे पडसाद सभागृहातही उमटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली. विधानसभा अध्यक्षांनी घडलेल्या घटनेसाठी गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांना खेद व्यक्त करण्याची सूचना दिली. तसेच धक्काबुक्की करणारे जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख आणि गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते ऋषी टकले यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येणार असं नार्वेकर यांनी सांगितलं होते. त्याबरोबरच या दोघांविरोधात विशेषाधिकार भंगाची कारवाई करण्यासाठी हे प्रकरण विधानसभेच्या विशेषाधिकार समितीकडे वर्ग करण्याची घोषणाही राहुल नार्वेकर यांनी केली होती.
एखाद्या गुन्ह्यातील आरोपीचे जेलमधून सुटल्यानंतर जंगी स्वागत होणे महाराष्ट्राला आता नवे नाही. पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे याचेही कार रॅली काढून तळोजा जेल ते पुणे स्वागत करण्यात आले. नुकतेच उल्हासनगर येथे अल्पवयीन मुलींच्या विनयभंग प्रकरणात अटक झालेल्या आरोपीची जामिनावर सुटका होताच पीडितेच्या घरासमोर ढोलताशे वाजवत, फटाके फोडून मिरवणूक काढण्यात आली. मीरारोड येथेही अमली पदार्थ विक्री करणाऱ्या आरोपीची जामिनावर सुटका झाल्यानंतर फटाके वाजवून मिरवणूक काढली.