पोलिस मारहाण प्रकरणातून गोपाळ शेट्टी यांची मुक्तता; ठोस, विश्वासार्ह पुराव्यांचा अभाव : न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 09:21 IST2025-07-25T09:21:14+5:302025-07-25T09:21:51+5:30

२००४ मध्ये पोलिस अधिकाऱ्यांना मारहाण केल्याच्या प्रकरणातून भाजपचे माजी खा. गोपाळ शेट्टी यांच्यासह पक्षाच्या अन्य कार्यकर्त्यांची न्यायालयाने सुटका केली आहे.

Gopal Shetty acquitted in police assault case; Lack of concrete, credible evidence: Court | पोलिस मारहाण प्रकरणातून गोपाळ शेट्टी यांची मुक्तता; ठोस, विश्वासार्ह पुराव्यांचा अभाव : न्यायालय

पोलिस मारहाण प्रकरणातून गोपाळ शेट्टी यांची मुक्तता; ठोस, विश्वासार्ह पुराव्यांचा अभाव : न्यायालय

मुंबई : २००४ मध्ये पोलिस अधिकाऱ्यांना मारहाण केल्याच्या प्रकरणातून भाजपचे माजी खा. गोपाळ शेट्टी यांच्यासह पक्षाच्या अन्य कार्यकर्त्यांची न्यायालयाने सुटका केली आहे. एफआयआरमध्ये नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्यांचे समर्थन खुद्द तपास अधिकाऱ्याने केलेले नाही. त्यामुळे ठोस, सुसंगत आणि विश्वासार्ह पुराव्यांअभावी दोन्ही आरोपी संशयाच्या फायदा मिळण्यास पात्र आहेत, असे निरीक्षणही यावेळी न्या. सत्यनारायण नावंदर यांनी नोंदवले.

सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, भाजप कार्यकर्ते नेताजी शिंदे यांना ९ सप्टेंबर २००४ रोजी महाराष्ट्र धोकादायक हालचाली प्रतिबंधक कायद्याअंतर्गत चौकशीसाठी कांदिवली येथील कस्तुरबा मार्ग पोलिस ठाण्यात नेण्यात आले होते. तेव्हा शेट्टी आणि गणेश खंकर हे दोघे रात्री पोलिस ठाण्यात धडकले. पोलिसांनी त्यांच्याकडे कोण आहात याची विचारणा केली असता दोघांनीही हवालदाराला धक्का मारला आणि आयुष्याची वाट लावण्याची धमकी देत आत निघून गेले. त्यानंतर ते डिटेक्शन रूममध्ये गेले आणि तेथील अधिकाऱ्याला शिवीगाळ केली, असा दावा सरकारी वकिलांनी केला.

तक्रारदाराची नोंदविलेली साक्ष अत्यंत कमकुवत आणि अविश्वसनीय आहे. तपास अधिकाऱ्याने तपासाबद्दल आणि आरोपपत्राची माहिती दिली. घटना घडली तेव्हा स्वत: उपस्थित असल्याचा किंवा त्याला धमकाविण्यात आल्याबाबत काहीच म्हटले नाही. सरकारी पक्षाच्या दाव्याचे हवालदाराने अंशत: समर्थन केले. मात्र, त्याच्याही साक्षीत विसंगती आहेत आणि उलटतपासणीदरम्यान त्याची साक्ष कमकुवत ठरली, असे न्यायालयाने निकालपत्रात नमूद केले आहे.

Web Title: Gopal Shetty acquitted in police assault case; Lack of concrete, credible evidence: Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.