good people from congress and ncp wants to join cm devendra fadnavis | काँग्रेस, राष्ट्रवादीतील नेत्यांना कशासाठी पक्षात घेतलं; मुख्यमंत्री म्हणतात...
काँग्रेस, राष्ट्रवादीतील नेत्यांना कशासाठी पक्षात घेतलं; मुख्यमंत्री म्हणतात...

मुंबई: सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून भाजपामध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत भाष्य केलं. दुसऱ्या पक्षात अनेक चांगली माणसं आहेत. त्यांच्यातील निवडक मंडळी घ्यावी लागतात. त्यामध्ये त्रागा करण्याचं काहीच कारण नाही, असं मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटलं.

काँग्रेस, राष्ट्रवादीतून अनेक मंडळी भाजपात येत असल्यानं पक्षातील निष्ठावानांवर अन्याय होत असल्याची चर्चा जोरात सुरू होती. या मुद्द्याला स्पर्श करत मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना विचलित न होण्याचा सल्ला दिला. 'भाजपा प्रायव्हेट लिमिटेड पार्टी नाही, तर ती पब्लिक अनलिमिटेड पार्टी आहे. भाजपाचं राजकारण पाहून विरोधी पक्षातील अनेक चांगल्या लोकांना पक्षात यायचं आहे. त्यांच्यातील निवडक मंडळी घ्यावी लागतात. त्यामध्ये त्रागा करण्याचं कारण नाही', असं मुख्यमंत्री म्हणाले. 

निवडणुकीवेळी भाजपात उड्या मारणाऱ्या नेत्यांना तिकीटं दिली जातात, अशी टीका अनेकदा होते. मात्र यामध्ये तथ्य नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. 'विरोधी पक्षातील चांगली माणसं पक्षात येतात. मात्र गेल्या निवडणुकीत ८५ टक्के तिकीटं पक्षातील लोकांनाच मिळाली. त्यामुळे कार्यकर्त्यांनी अजिबात विचलित न होता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागावं' अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. यावेळी त्यांनी विरोधकांना टोलादेखील लगावला. विरोधकांचे राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष, मुंबई अध्यक्ष पराभूत झालेत. राष्ट्रवादीच्या अध्यक्षांनी तर निवडणूकच लढवली नाही. वंचितचे अध्यक्ष निवडणुकीत पराभूत झाले, अशी कोपरखळी मुख्यमंत्र्यांनी लगावली.


Web Title: good people from congress and ncp wants to join cm devendra fadnavis
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.